कोस्टल रोड प्रकल्पातील बोगदे बनणार ‘फायर प्रूफ’, ‘वॉटर मिस्ट टर्बाइन’ वाहन सेवेत कार्यरत होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोस्टल रॉड प्रकल्पातील बोगदे आता फायर प्रूफ बनणार असून त्यासाठी प्रशासनाकडून ‘वॉटर मिस्ट टर्बाइन’ वाहन तैनात करण्यात येणार आहे. हे ‘वॉटर मिस्ट टर्बाइन’ वाहन लवकरच सेवेत कार्यरत होणार आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती बोगद्यात लागलेली आग नियंत्रणात आणणे सहज शक्य होणार आहे. या वाहनासाठी महापालिका 6 कोटी 32 लाख 800 रुपये खर्च करणार आहे. बुधवार 24 जून रोजी होणाऱया स्थायी समितीच्या बैठकीत त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

कोस्टल रोडवर मरीन ड्राइव्ह ते वरळी व वरळी ते मरीन ड्राइव्ह असे दोन बोगदे असून तेथून दररोज हजारो लोक प्रवास करतात. नव्याने बांधण्यात आलेल्या कोस्टल रोड बोगद्यात आपत्कालीन परिस्थितीत आग नियंत्रण व विमोचन कार्यासाठी तसेच तातडीने उपाययोजना करण्यासाठी वॉटर मिस्ट टर्बाइन या वाहनाची मागणी करण्यात आली आहे. वाहनाची बांधणी, पुरवठा, चाचणी व कार्यान्वतीकरण दोन वर्षाच्या हमी कालावधीसह खरेदी करण्याचे प्रस्ताविले आहे.

महापालिकेचे अग्निशमन दल सज्ज

मुंबईतील जनतेच्या जीविताचे व संपत्तीचे आगीपासून व इतर दुर्घटनेपासून संरक्षण करण्यासाठी महापालिकेचे अग्निशमन दल सज्ज आहे. यासाठी मुंबई अग्निशमन दलात 35 अग्निशमन केंद्रे, 19 लघु अग्निशन केंद्रे व 300 पेक्षा अधिक वाहनांचा ताफा असून यामध्ये विविध प्रकारची अग्निशमन व विमोचन वाहने आहेत. त्यात आता ‘वॉटर मिस्ट टर्बाइन’ वाहनाची भर पडणार आहे.