सामना अग्रलेख – शहांची ‘झुंड शाळा’, पंतप्रधान होण्याची घाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमित शहा यांच्या मेंदूस पक्षघात झाल्याचे आणखी एक लक्षण म्हणजे कोल्हापुरात त्यांनी ‘मिंधे’ यांना शिवसेनाप्रमुख म्हणून जाहीर केले. सुप्रीम कोर्टात शिवसेनेचा खटला सुरू असताना गृहमंत्री परस्पर शिवसेना कोणाची हा निकाल देतात. ही न्यायव्यवस्थेतील शहांची घुसखोरी आहे. शहा यांना पंतप्रधान होण्याची घाई झाली आहे व मिंध्यांसारख्या झुंडांच्या मदतीने ते मोदींना आव्हान देण्याची तयारी करत आहेत. मोदी यांनी आता सावध राहायला हवे. फडणवीस यांचे झाकण तर केव्हाच उडवले गेले आहे!

अमित शहा बराच काळ देशाचे गृहमंत्री आहेत. हे त्यांचे कर्तृत्व नसून भाग्य आहे. देशासाठी मात्र ते दुर्भाग्य आहे. याच अमित शहांनी काल कोल्हापुरात सांगितले की, ‘‘हा देश ‘धर्मशाळा’ नाही. इथे केवळ याच देशात जन्मलेले लोक राहतील.’’ शहा असेही म्हणाले की, ‘‘आम्ही देशभरातील प्रत्येक घुसखोराला शोधून बाहेर काढू.’’ शहा यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला, पण हे सर्व प्रत्यक्ष कृतीत उतरणार कधी? देश धर्मशाळा नाही. कोणीही येतो व पथारी पसरून राहतो. नियम नाही, कायदा नाही. बेकायदेशीरपणे राहायचे व घाण करायची यास कोणीच मान्यता देणार नाही. त्यामुळे शहा यांच्या भूमिकेला पाठिंबा मिळायला हवा. प्रश्न इतकाच आहे की, भारताची ‘धर्मशाळा’ झाली आहे हे ठरवणारे अमित शहा कोण? किमान दोन ‘टर्म’ शहा गृहमंत्री आहेत व त्यामुळे जर धर्मशाळा झाली असेल तर त्यास सर्वस्वी जबाबदार गृहमंत्री आहेत. मोदी हे बारा वर्षे पंतप्रधान आहेत. बारा वर्षांत सीमा पार करून जे घुसखोर भारतात आले ते काही लाखांच्या घरात आहेत. मग देशाची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था ज्यांच्या हाती आहे असे अमित शहा हे फक्त इतरांचे पक्ष फोडण्यातच दंग राहिले काय? अमित शहांचा रोख बांगलादेशींवर आहे व तो योग्य आहे. हे बांगलादेशी गेल्या दहा-बारा वर्षांत मोठ्या प्रमाणात भारतात आले. या घुसखोरीची जबाबदारी केंद्रातील गृहखात्याची नाही काय? अमित शहा म्हणतात त्याप्रमाणे आपल्या देशात केवळ भारतातच जन्मलेले लोकच राहतील हे मान्य केले तर बांगलादेशच्या पदभ्रष्ट पंतप्रधान शेख हसीना यांना त्यांच्या कुटुंबासह भारतात राजाश्रय कोणी दिला आहे? पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांनीच हा आश्रय दिला आहे. शहा म्हणतात, ‘‘देशभरातील

प्रत्येक घुसखोराला

बाहेर काढू.’’ प. बंगाल, आसाम, मेघालय, कश्मीर खोऱ्यात एखादी निवडणूक आली की, बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा भाजपकडून उचलला जातो व जणू राष्ट्राच्या भवितव्याची चिंता आम्हालाच असा तोरा दाखवला जातो. गेल्या बारा वर्षांत किती घुसखोर सीमेबाहेर नेऊन सोडले, हे गृहमंत्री शहा सांगू शकणार नाहीत. जम्मूच्या निर्वासित छावण्यांत राहणाऱ्या कश्मिरी पंडितांना त्यांच्या ‘घरी’ म्हणजे अनंतनाग, श्रीनगर, सोनमार्ग, गुलमर्ग अशा ठिकाणी अद्यापि सरकार सुरक्षित पोहोचवू शकलेले नाही. सत्य असे आहे की, गृहमंत्री शहा यांच्याच काळात घुसखोर आले व पुलवामात स्फोट घडवून 40 भारतीय जवानांची हत्या करून गेले. शहांच्याच काळात पुन्हा घुसखोर अतिरेकी आले व पहलगाममध्ये 26 हिंदू पर्यटकांवर गोळीबार करून त्यांना ठार करून गेले. म्हणजे अतिरेकी काँग्रेसच्या नव्हे, तर भाजपच्याच मांडीवर बसले आहेत व सरकार त्यांचा बालही बाका करू शकलेले नाही. देशातील जनता तुमच्याकडे तुम्ही तुमच्या बारा वर्षांच्या सत्ताकाळात काय केले याचा हिशोब मागत आहे. मुळात गोंध्रा कांडातील निर्घृण पुण्याईवर सत्तेत आलेले हे सरकार विचाराने व कृतीने अघोरी आहे. मणिपूर पेटले आहे. आदिवासींच्या दोन वर्गात कलह भडकला आहे. गृहमंत्री अमित शहा मणिपूरबाबत चिंता करताना कधी दिसले नाहीत. मणिपुरात काँग्रेसचे शासन नसून भाजपचेच सरकार आहे. मणिपुरात रोज महिलांवर अत्याचार सुरू आहेत. कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत, पण गृहमंत्री प्रादेशिक पक्ष फोडून ‘चिअर्स’ करीत आहेत. शहा यांचे म्हणणे आहे की, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा जसा विकास व्हायला हवा होता, तसा तो स्थानिक पातळीवर झालेला नाही. शहासाहेब, मंदिराचा विकास म्हणजे

देवाच्या दानपेट्यांवर दरोडे

हे देशाने अयोध्येतील राममंदिरात आता पाहिले आहे. राममंदिरातले दान, सोने, चांदी, दागिने सरळ लुटण्यात आले. करसेवकांनी राममंदिरासाठी रक्त सांडले, हौतात्म्य पत्करले व भाजपवाल्यांनी तेच मंदिर लुटले. गझनीच्या महमुदाने सोमनाथ लुटले तसे भाजपने राममंदिर लुटले. त्यावरही जरा बोला. अंबाबाई मंदिरात अशा चोऱ्यामाऱ्या तरी झालेल्या नाहीत. अयोध्येतील दानपेटीवर दरोडा हा कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा आहे. राममंदिराचे संरक्षण करता येत नाही व आले आमच्या अंबाबाईचा विकास करायला. देशातील अनेक प्रमुख मंदिरांची लूट गेल्या दहा वर्षांत झाली व हे सर्व लुटेरे भाजपमध्ये व श्रीमान अमित शहांच्याच मांडीवर बसलेले दिसतात. काँग्रेस पक्षाच्या मांडीवर उद्धव ठाकरे बसले आहेत तो पक्ष घुसखोरांचा ‘व्होट बँक’ म्हणून वापर करून आपले अस्तित्व टिकवू पाहतोय, असे शहा म्हणतात. ही त्यांची महाराष्ट्रविरोधी ओकारी आहे. स्वतः हे राममंदिराचे दरोडेखोर आहेत, लोकशाहीचे हत्यारे आहेत. स्वातंत्र्य लढ्यात कोणतेही योगदान नसलेले हे लोक ‘ठाकऱ्यां’कडे बोट दाखवतात. शहा यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे हे लक्षण आहे. अमित शहा यांच्या मेंदूस पक्षघात झाल्याचे आणखी एक लक्षण म्हणजे कोल्हापुरात त्यांनी ‘मिंधे’ यांना शिवसेनाप्रमुख म्हणून जाहीर केले. सुप्रीम कोर्टात शिवसेनेचा खटला सुरू असताना गृहमंत्री परस्पर शिवसेना कोणाची हा निकाल देतात. ही न्यायव्यवस्थेतील शहांची घुसखोरी आहे. शहा यांना पंतप्रधान होण्याची घाई झाली आहे व मिंध्यांसारख्या झुंडांच्या मदतीने ते मोदींना आव्हान देण्याची तयारी करत आहेत. मोदी यांनी आता सावध राहायला हवे. फडणवीस यांचे झाकण तर केव्हाच उडवले गेले आहे!