
>> महेश उपदेव
विदर्भावर होणाऱ्या आर्थिक आणि सिंचन अन्यायाविरुद्ध विधान परिषदेत बुलंद आवाज उठविणारे आणि विधान परिषदेचे पाच वेळा प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ भाऊराव तुळशीराम देशमुख ऊर्फ बी. टी. यांच्या जाण्याने अमरावती किंवा विदर्भाचीच नव्हे तर संपूर्ण राज्याची हानी झाली आहे. महाराष्ट्राच्या सिंचन अनुशेषाच्या लढय़ातील मार्गदर्शक दीपस्तंभ तसेच विदर्भातील शिक्षक चळवळीचे आधारस्तंभ अशी तर त्यांची ओळख होतीच. शिवाय या सर्व प्रश्नांवरून तब्बल 30 वर्षे विधान परिषदेत आवाज उठविणारा तोफखाना अशीही ‘ बी. टी.’ यांची प्रतिमा होती. सभागृहाचा चालताबोलता नियमकोश अशी त्यांची ओळख होती. केवळ शिक्षकांचेच प्रश्न नव्हे तर विदर्भाचा सिंचनाचा आणि विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी त्यांनी रस्त्यापासून ते सभागृहापर्यंत दिलेला लढा महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे.
प्रा. बी. टी. देशमुख यांचा जन्म अत्यंत सामान्य कुटुंबात झाला. गरिबी आणि संघर्षाचे चटके सोसत त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. विदर्भाच्या मातीशी त्यांची नाळ पहिल्यापासूनच घट्ट जोडलेली होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमरावती येथील नामांकित महाविद्यालयात इंग्रजी आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. शिक्षकांना न्याय मिळवून द्यायचा असेल, तर संघटित ताकदीशिवाय पर्याय नाही, हे त्यांनी ओळखले होते. विदर्भातील महाविद्यालयीन शिक्षकांना एकत्र आणून ‘ नुटा’ (Nagpur University Teachers’ Association – NUTA) या संघटनेची पायाभरणी केली. विधान परिषदेत ते बोलायला उभे राहिले की, सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंचे आमदार शांततेत त्यांचे भाषण ऐकायचे. नियम 57, नियम 97 किंवा औचित्याचा मुद्दा असो, संसदीय कामकाजाच्या नियमांवर त्यांचे प्रचंड प्रभुत्व होते. शिक्षण क्षेत्राचे व्यापारीकरण होऊ नये आणि गरीब, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी सभागृहात नेहमीच आवाज उठवला. प्रा. बी. टी. देशमुख हे जरी शिक्षक आमदार म्हणून निवडून आले तरी त्यांचे कार्य केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते. ते विदर्भाचे खरे सुपुत्र होते. विदर्भावर होणाऱया आर्थिक आणि प्रादेशिक अन्यायाची त्यांना तीव्र जाणीव होती. विदर्भाचा सिंचन आणि विकास कामांचा अनुशेष नेमका किती आहे, हे शोधण्यासाठी स्थापन झालेल्या विविध समित्यांच्या अहवालांचा त्यांनी अक्षरशः कीस पाडला. दांडेकर समितीच्या अहवालाचा आधार घेऊन त्यांनी विदर्भाच्या सिंचनाचा अनुशेष हजारो कोटी रुपयांचा कसा आहे, हे राज्य सरकारच्या प्रखरपणे लक्षात आणून दिले.
विदर्भाला त्याच्या हक्काचे पाणी आणि निधी मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी त्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात कित्येकदा सरकारला धारेवर धरले. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणामुळे अनेकदा सरकारला विदर्भासाठी विशेष पॅकेज किंवा निधीची घोषणा करावी लागली होती. अर्थात राजकारणात राहूनही त्यांनी आपली नैतिक मूल्ये कधीही ढळू दिली नाहीत. कोणत्याही पक्षाचे सरकार असो, जे चुकीचे आहे त्याला चुकीचे आणि जे बरोबर आहे त्याला बरोबर म्हणण्याचे धैर्य त्यांच्यात होते. बी. टी. देखमुख केवळ उत्तम वत्ते नव्हते, तर ते एक कसलेले लेखक आणि अभ्यासकही होते. त्यांनी शिक्षण, अर्थशास्त्र आणि विदर्भाच्या प्रश्नांवर विपुल लेखन केले. त्यांनी विदर्भाचा अनुशेष, शैक्षणिक कायदे आणि संसदीय कार्यपद्धती यांवर अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तके व पुस्तिका लिहिल्या, ज्या आजच्या संशोधकांसाठी मार्गदर्शक आहेत. शिक्षकांमध्ये वैचारिक जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी ‘नुटा बुलेटीन’चे संपादन केले. याद्वारे शिक्षकांना कायद्याचे ज्ञान सोप्या भाषेत दिले गेले. बी. टी. सभागृहात बोलायला उभे राहिले की त्यांच्या बोलण्यात अस्सल वऱहाडी बाज असायचा, प्रश्न सुटले नाही म्हणून त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. नागपूरच्या सेंट्रल इंडिया फाऊंडेशनच्या वतीने डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती पहिला ज्ञानयोगी पुरस्कार नुकताच बी. टी. यांना प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या निधनाने विदर्भाने आपला हक्काचा, आकडेवारीनिशी लढणारा ‘कैवारी’ गमावला आहे. तर महाराष्ट्र विधिमंडळाने एक ‘चालता-बोलता नियमकोश’ आणि मार्गदर्शक गमावला आहे.






























































