
जर्मनीला फुटबॉलमध्ये का महासत्ता म्हटलं जातं, याचं जिवंत उदाहरण टोरोंटोच्या मैदानावर पाहायला मिळालं. एक गोलने पिछाडीवर असलेला संघ वेळ निसटत असतानादेखील हार मानत नाही आणि शेवटच्या क्षणी प्रतिस्पर्ध्याच्या स्वप्नांवर पाणी फेरतो, हे जर्मनीने पुन्हा एकदा दाखवून दिलं. डेनीज उंडावच्या दोन सणसणीत गोलांच्या जोरावर जर्मनीने आयव्हरी कोस्टचा 2-1 असा थरारक पराभव करत फिफा वर्ल्ड कपच्या बाद फेरीतील स्थान जवळपास दिमाखात पक्कं केलं. मात्र विजयाचे स्वप्न पाहणाऱ्या आयव्हरीला लॉस्टची कॉस्ट मोजावी लागली.
सामन्याच्या सुरुवातीपासून जर्मनीने चेंडूवर वर्चस्व गाजवलं. पासिंग, हालचाली आणि आक्रमणांची मालिका सुरू होती. मात्र आयव्हरी कोस्टची बचावफळी अभेद्य भिंतीसारखी उभी होती. जर्मन खेळाडू गोलचा रस्ता शोधत होते, पण समोरची भिंत ढासळत नव्हती. उलट 30 व्या मिनिटाला आयव्हरी कॉस्टनेच घातक पलटवार केला. यान डियोमांडेच्या भन्नाट धावीनंतर तयार झालेल्या संधीचं सोनं करत फ्रँक कॅसीने अचूक फिनिश साधला आणि चेंडू जाळ्यात धाडत आयव्हरी कोस्टला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. टोरोंटो स्टेडियममध्ये आयव्हरी कोस्टच्या चाहत्यांचा जल्लोष सुरू झाला, तर जर्मनीच्या छावणीत चिंतेचं वातावरण पसरलं.
पहिल्या सत्राच्या अखेरपर्यंत जर्मनीने बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले. पण प्रत्येक वेळी आयव्हरी कोस्टचा बचाव त्यांच्या आडवा येत राहिला. मध्यंतराला जर्मनी पिछाडीवर होता आणि सामन्याचं चित्र आयव्हरी कोस्टच्या बाजूने झुकलेलं दिसत होतं. मात्र दुसऱ्या सत्रात मैदानावर उतरलेला जर्मनी हा वेगळाच जर्मनी होता. जणू कोणीतरी त्यांच्या अंगात विजेचा प्रवाह सोडला होता. त्यांनी आक्रमणांची तीव्रता वाढवली. आयव्हरी कोस्टच्या गोलपोस्टवर हल्ल्यांवर हल्ले सुरू झाले. अखेर 68 व्या मिनिटाला जर्मनीच्या सातत्याला यश मिळालं. बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या डेनीज उंडावने अचूक फटका मारत जर्मनीला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. हा गोल म्हणजे जर्मनीसाठी केवळ बरोबरी नव्हती, तर पुनरागमनाची रणशिंग फुंकणारा क्षण होता.यानंतर सामना अक्षरशः पेटला. दोन्ही संघ विजयासाठी झुंजत होते. आयव्हरी कोस्ट बचावात गुंतला होता, तर जर्मनी विजयासाठी तुटून पडला होता. प्रत्येक मिनिटागणिक तणाव वाढत होता. सामना अनिर्णित राहील असंच वाटत असताना जर्मनीने आपली खरी ओळख दाखवली. इंज्युरी टाइम सुरू झाला आणि चौथ्या व्या मिनिटाला आयव्हरी कोस्टच्या छातीत खंजीर खुपसावा तसा निर्णायक वार झाला. फेलिक्स एनमेचाच्या पासवर डेनीज उंदावने विजेच्या वेगाने टर्न घेतला आणि जोरदार फटका मारत चेंडू जाळ्यात पाठवला. एका क्षणात जर्मन खेळाडू जल्लोषात बुडाले, तर आयव्हरी कोस्टचे खेळाडू स्तब्ध झाले. उंदावचा हा दुसरा गोल जर्मनीसाठी सुवर्णक्षण ठरला.
डेनीज उंडाव या सामन्याचा निर्विवाद नायक ठरला. त्याच्या दोन गोलांनी जर्मनीला सलग दुसरा विजय मिळवून दिला. सहा गुणांसह जर्मनी ग्रुप-ईमध्ये अव्वल स्थानी पोहोचला असून त्याने बाद फेरीतील जागेवर मजबूत शिक्कामोर्तब केलं आहे. दुसरीकडे, शानदार सुरुवात करूनही आयव्हरी कोस्टला स्पर्धेतील पहिल्या पराभवाचा कडू घोट पचवावा लागला.




























































