
रद्द झालेला एफसीआरए नोंदणी क्रमांक त्यातच परदेशी निधी बंद झाल्याने खर्डीतील सिल्व्हर वूड्स इंग्लिश मीडियम स्कूलला व्यवस्थापनाने आगामी शैक्षणिक वर्षापासून टाळे लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे आरटीईअंतर्गत प्रवेश घेतलेल्या जवळपास १४ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आले आहे. संस्था आणि शिक्षण विभागाच्या बेफिकीर कारभारामुळेच ही वेळ आल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
रूरल गोस्पेल ॲण्ड मेडिकल मिशन ऑफ इंडिया या संस्थेची खर्डी येथील सिल्व्हर वूड्स इंग्लिश मीडियम स्कूल आहे. जून २०२६ पासून शाळेचा एफसीआरए (Foreign Contribution Regulation Act) नोंदणी क्रमांक नूतनीकरण न झाल्यामुळे बंद झाले आहे. त्यातच या स्कूलला रूरल गोस्पेल ॲण्ड मेडिकल मिशन ऑफ इंडियाने परदेशी निधी देणे बंद केल्याने हे स्कूल आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने आगामी शैक्षणिक वर्षापासून हे स्कूल बंद करणार असल्याचे चार महिन्यांपूर्वी जाहीर केले. त्यामुळे आरटीईअंतर्गत प्रवेश घेतलेल्या जवळपास १४ विद्यार्थ्यांच्या पालकांचे टेन्शन वाढले आहे. काही पालकांनी अन्यत्र धावपळ करून ॲडमिशन घेतले असले तरी यातील तीन ते चार पालकांची परिस्थिती हलाखीची असल्याने आता करायचे काय, अशी अवस्था त्यांची झाली आहे.
पालकांचा उपोषणाचा इशारा
पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत आहेत. पण शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने त्यांनी ७ दिवसांपासून हेलपाटे मारून गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. मात्र अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याने उपोषणाचा इशारा दिला आहे, अशी माहिती पालक प्रमोद केदारे यांनी दिली. दरम्यान गटशिक्षणाधिकारी हिराजी वेखंडे यांनी शाळेच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणी झाली असून सोमवारपासून नियमितपणे शिक्षक उपलब्ध करून शाळा सुरू होईल असे सांगितले.



























































