
शाळा सुरू होऊन आठवडा उलटत असतानाच तळोजा पेंधर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा सध्या जीवघेणा खेळ सुरू आहे. येथे शिकणाऱ्या साडेतीनशे विद्यार्थ्यांच्या डोक्यावर स्लॅब कोसळण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन सध्या एका मंदिरात व खासगी ठिकाणी मुलांना धडे गिरवावे लागत आहेत. दरम्यान कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत हा स्लॅब असल्याने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शिक्षक, विद्यार्थ्यांसह पालकांनीदेखील केली आहे.
तळोजा पेंधर येथील झेडपीच्या शाळेची इमारत धोकादायक म्हणून जाहीर झाली आहे. सध्या येथील विद्यार्थ्यांची तात्पुरती व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी केली असली तरी शिक्षणाधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, पनवेल महानगरपालिका यांच्याकडे दुरुस्तीसाठी शाळा व्यवस्थापन समितीने अनेकदा पाठपुरावा केला. पण कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. विद्यार्थ्यांच्या डोक्यावर स्लॅब कोसळण्याची भीती असल्याने त्याचा परिणाम शिक्षणावरदेखील होत आहे.
तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटूनही शाळेची दुरुस्ती किंवा नवीन इमारत उभारण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावर्षी पेंधरच्या शाळेत १५० हुन अधिक नवीन प्रवेश झाले असून एकूण विद्यार्थी संख्या ३५० च्या पुढे गेली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांच्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत.
… तर ठिय्या आंदोलन करणार
शाळेच्या इमारतीची दुरुस्ती तातडीने करण्याची गरज असून त्यास त्वरीत मंजुरी द्यावी आणि विद्यार्थ्यांवरील टांगती तलवार दूर करावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश भोईर यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व पालकांनी केली आहे. लवकरात लवकर दुरुस्ती सुरू न केल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.




























































