
पावसाने पाठ फिरवल्याने मोखाड्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. मात्र इतकी भयंकर परिस्थिती निर्माण होऊनही प्रशासन टँकरने पाणीपुरवठा करण्यास चालढकल करत असल्याने भोवाडी, कुंडाचापाडा येथील संतप्त आदिवासी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करून अधिकाऱ्यांना जाब विचारला. यानंतर तंतरलेल्या प्रशासनाने तत्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे महिलांची हंडाभर पाण्यासाठी होणारी वणवण थांबली आहे.
मोठा गाजावाजा करून केंद्र आणि राज्य सरकारने आदिवासी भागातील महिलींच्या डोक्यावरील हंडा उतरवण्यासाठी राज्यात जलजीवन मिशन योजना आणली. मात्र पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात या योजनेचा सपशेल बोजवारा उडाला आहे. असे ग्रामपंचायतीमधील शास्त्रीनगर नळ पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने मे २०२३ मध्ये पूर्ण झाल्याची माहिती सरकारी अहवालात दिली होती. त्याअंतर्गत भोवाडी आणि कुंडाचापाड्याचा समावेश आहे. मात्र येथे अजूनही नळद्वारे पाणी पोहोचलेले नाही. त्यामुळे महिलींच्या डोक्यावरील हंडा खाली उतरला नाही. महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकत फिरावे लागत होते.
पाण्याचे टँकर सोडण्याच्या मागणीसाठी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. यावेळी भोवाडीला टँकरद्वारे पाणीपुरवठा तर सोडाच नळयोजनेला करणाऱ्या दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. अखेर पंचायत समिती आणि ग्रामपंचायत प्रशासन नमले आणि त्यांनी भोवाडीला तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला. नळ पाणीपुरवठा योजनेच्या चौकशीच्या मागणीचे लेखी उत्तर दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

























































