लेकीसाठी बाप बिबट्याशी भिडला, अकोले तालुक्यातील थरारक घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका पित्याने जिवाची पर्वा न करता आपल्या  चार वर्षांच्या मुलीला बिबट्याच्या तावडीतून सोडवले. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील डोंगरगावमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. बिबट्याच्या जबड्यातून सोडवण्यासाठी तो चक्क बिबट्याशी भिडला. मात्र मुलीची सुटका केल्यानंतर जीव वाचवण्यासाठी धावत असताना बाप-लेक दोघेही अंधारात खोल विहिरीत कोसळले. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शनिवारी डोंगरगाव येथील मनोज गुंजाळ यांची चार वर्षांची लेक अवनी अंगणात खेळत होती. त्याचवेळी घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने अचानक झडप घातली. मुलीचा आक्रोश आणि आईचा आरडाओरडा ऐकताच वडील मनोज गुंजाळ यांनी क्षणाचाही विलंब न करता बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता मनोज गुंजाळ यांनी बिबट्याशी झुंज देत अवनीची सुटका केली.  त्यानंतर मुलीला कडेवर घेऊन घराच्या दिशेने धावत असताना अंधारामुळे समोरील विहीर दिसली नाही आणि बाप-लेक दोघेही खोल विहिरीत कोसळले. ग्रामस्थांनी धाव घेत दोघांनाही विहिरीतून बाहेर काढले.