
कर्नाटकमध्ये नेतृत्वबदल झाला असून डीके शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. त्यांच्याकडे कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही होते. आता त्यांच्या जागी बी.के. हरिप्रसाद यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी त्यांचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित होते.
खरगे यांचे भाषण सुरू असताना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या समर्थनार्थ ‘डीके-डीके’ अशी घोषणाबाजी सुरू झाली. यामुळे खरगे यांचा पारा चढला आणि त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना चांगलेच झापले. खरगे यांनी विनाकारण घोषणाबाजी करणाऱ्यांचा उल्लेख ‘युजलेस फेलोज’ असा केला. तसेच हा कार्यक्रम पक्षाचा आहे, कोणत्याही एका नेत्याचा नाही, अशी स्पष्ट जाणीव करून दिली.
कार्यक्रमादरम्यान शिवकुमार यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली, तेव्हा खरगे यांचा पारा चढला. शांत राहा! खाली बसा. जणू काही अख्खा देश तुमच्याच हातात आलाय. युजलेस फेलोज! अशा कडक शब्दांत खरगे यांनी गोंधळ घालणाऱ्यांना सुनावले. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये स्वतः मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार देखील कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करताना आणि खाली बसण्याचे इशारे करताना दिसत आहेत.
#WATCH | Bengaluru, Karnataka: Congress President Mallikarjun Kharge loses his cool at party workers during the Sankalpa Samavesha programme after the workers raised “DK-DK” slogans
“Will the entire country be affected if you shout here? This is not an individual’s programme, it… pic.twitter.com/jmO0rLMftK
— ANI (@ANI) June 21, 2026
हा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम आहे. हा कोणत्या एका व्यक्तीसाठी आयोजित केलेला मेळावा नाही. पक्षाला बळकट करण्यासाठी आणि एकसंध ठेवण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्र आलो आहोत. जर एक गट एका नेत्याचे नाव ओरडणार असेल आणि दुसरा गट दुसऱ्या नेत्याचे, तर मग इथे उपस्थित असलेले इतर लोक काय फक्त कचरा काढायला आलेत का? असेही खरगे म्हणाले.
कार्यकर्त्यांची ओळख ही पक्षामुळेच आहे. पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, पक्षासाठी शिस्त अत्यंत महत्त्वाची आहे. इथे जे कोणी घोषणाबाजी करत आहेत, त्या सगळ्यांचे फुटेज आमच्याकडे उपलब्ध असेल. या व्हिडिओ फुटेजची तपासणी करून दोषींवर कडक शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

























































