
शिवसेना शिंद गट वगैरे काही नसून एकच शिवसेना आहे, ती म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष. दुसरे भाजपचे गुलाम आहेत. हे विकाऊ लोक उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर एनडीए विरोधात निवडून आले होते, स्वत:च्या किंवा भाजपच्या चेहऱ्यावर नाही. स्वत:चा स्वार्थ, हावरेपणा लपवण्यासाठी निर्लज्जपणे त्यांनी आपली निष्ठा विकली. आता लोकंच त्यांना मतदारसंघात उत्तर देतील आणि कुठले ऑपरेशन करायचे ते ठरवतील, असा जोरदार हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी गद्दार खासदारांवर केला. ते मुंबईत विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधत होते.
लोभी खासदारांनी निष्ठा आणि प्रतिष्ठा निर्लज्जपणे विकली. तसेच सरकार पक्षपाती आहे आणि राजकीय फायद्यासाठी जनतेच्या पैशाचा वापर करते हे देखील यावरून सिद्ध झाले, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले. यासंदर्भात त्यांनी एक्सवर एक पोस्टही शेअर केली आहे.
पक्षांतर केलेले खासदार महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या विचारसरणीवर एनडीएच्या विरोधात निवडून आले होते. त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मैदानात उतरले होते. प्रत्येकानेच सर्व पक्षांच्या आणि मित्रपक्षांच्या नेत्यांच्या सभांची मागणी केली होती. त्यामुळे, आम्ही अमुक विचारसरणीपासून दूर गेलो आणि तमुक पक्षाशी युती केली असा आरोप करण्याचीही त्यांची पात्रता उरलेली नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
या खासदारांच्या मतदारसंघातील मतदारांनी देखील एनडीए विचाराच्या विरोधात कौल देऊन उमेदवारांना विजयी केले. पण, केवळ लोभीपणामुळे तुम्ही एका रात्रीत या सर्व गोष्टींना निर्लज्जपणे तिलांजली दिली, हे तुम्ही उघडपणे मान्य करायला हवे.
To the greedy MPs who have hopped over, you only prove the following, stronger than before:
1) Your loyalty, your reputation is for sale, shamelessly
2) The government is biased and uses public money, politically, as fundsAll of the ones that are jumping over now were elected…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 22, 2026
निधी मिळत नव्हता म्हणून पक्ष सोडल्याचे गद्दार खासदार म्हणत आहेत. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, हे सरकार कसे मतभेद करते हे स्पष्ट होत आहे. विरोधकांना निधी मिळत नाही. सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षालाही थोडाफार निधी देत होते. कारण लोकप्रतिनिधी जनतेतून निवडून येतात. निधी दिला नाही तर लोकप्रतिनिधींच्या मतदारावर नाही, तर सत्ताधाऱ्यांच्या मतदारावरही होतो. कारण सर्वच देशाचे नागरीक आहेत. हे जे पळत आहेत ते मतदारसंघाच्या निधीसाठी नाही, तर स्वत:च्या खिशांसाठी पळून गेले आहेत. त्यांनी सौदा केला आहे.
भाजपला सरकार चालवता येत नाही. मुंबईमध्ये पाणीकपात होत होती, पण आता गढूळ पाणी येत आहे. वीजेचा लपंडावही सुरू आहे. मुंबईतच नाही तर पुण्यातही एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. इथेनॉलसाठी पाणी खेचले जातंय, पण लोकांना पिण्यासाठी मिळत नाहीय. भाजप सरकार चालवण्यापेक्षा नुसती तोडफोड कशी करायची, लोकांचे पश्न, घरं कशी तोडायची यावर लक्ष केंद्रीत करून आहे. सरकार चालवण्याकडे लक्ष दिले तर चांगले होईल. पण आमदार फोडू, खासदार फोडू, परत नगरसेवक फोडू… हेच करत बसले आहेत. त्याऐवजी थोडे तरी लक्ष निवडणूक आयोगाने ज्यासाठी निवडून दिले त्याकडे द्या, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

























































