
रामाच्या आशीर्वादाने आलेले हे हे सरकार रामाच्या शापाने पडेल, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळाासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच मंदिर लुटणारे भाजप हे नवीन मोगल, यावर मोदींनी अवाक्षरही काढलेले नाही असेही संजय राऊत म्हणाले.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, अमित शहांनी निर्माण शिंद्यांसारखे सैतान निर्माण केलेल आहेत. हे सैतान मुख्यमंत्र्यांच्या मानेवर बसून त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न करेल. अशा वेळेला आम्हालाही राज्याच्या हितासाठी भूमिका घ्यावी लागेल. याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असेही संजय राऊत म्हणाले.
ओमराजे निंबाळकर हे नामचीन गद्दार आहेत. गद्दारांना भूमिका असते का? यांच्या सोबतचे लोकही गद्दार आहेत. इतिहासात मीर जाफर पासून ते महाराष्ट्रात जे लोक गद्दार झाले त्यांना काही भूमिका असू शकते का? शिवसेना तोडणे म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे करणे आणि अमित शहा ते शिंदे गटाच्या माध्यमातून ते करत आहेत. अंडरवर्ल्डमध्ये दाऊदचे, करीम लालाचे कॉन्ट्रॅक्ट किलर होते, तसे शिंदे हे अमित शहांचे कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत. आणि हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग महाराष्ट्र नेस्तनाबूत करण्यासाठी आहे, असे संजय राऊत म्हणाले.
ओमराजे निंबाळकर यांना वस्तूस्थिती आणि सत्य परिस्थिती समजावून देण्यासाठी कैलास पाटील आणि वरुण देसाई यांनी त्यांची भेट घेतली. शिंदे गटात गेल्यामुळे निंबाळकरांच्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळणार असेल तर त्यांचा आत्मा त्यांना आशीर्वाद देणार असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे. ओमराजे निंबाळकर यांनी ज्यांच्यावर आरोप केला आहे ते सुद्धा महायुतीतच आहेत. आता ते दोघे मांडीला मांडी लावून बसतील. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. आणि स्वार्थाचे शिखर आहे. ओमप्रकाश निंबाळकरांच्या वतीने 15 कोटी रुपये कोणी स्विकारले याची सर्व माहिती उद्धव ठाकरे यांना माहित आहे. विकासासाठी हे गेले म्हणतात. भाजपने मराठवाड्याचा काय विकास केला? सरकारकडून फक्त मतदारसंघाचा विकास होत नाही. विकास हा प्रांताचा आणि प्रदेशाचा होतो. लातूरचा विकास विलासराव देशमुखांनी केला होता. धाराशिवचा विकास हा युतीचे राज्य असताना झाले होता. साखर कारखाने उभे करणे म्हणजे विकास होत नाही. खासदारांना 100 कोटी रुपये मिळाले म्हणून त्यांचा वैयक्तिक विकास झाला तर तसे नाही होत, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आडवं करण्याची सुपारी घेतली आहे. आणि शिंद्यांना अमित शहांचा पाठिंबा आहे. पण देवेंद्र फडणवीस हे बुद्धिबळाच्या पटावर बसलेले प्यादे नाहीत.
शिवसेनेत आजही माझ्यासारखे लोक आहेत, जे या पक्षासाठी ठाकरे कुटुंबासाठी जीवाची बाजी लावायला तयार आहेत. एकनाथ शिंदे यांनी पैश्यांचा माज दाखवू नये, माणसांचे जीवन हे क्षणभंगूर आहे. अजित दादांचे काय झाले बघा. एवढी मस्ती दाखवू नका. आज आहात, उद्या नसाल. सहा खासदार हे शिंदे गटात गेले आहेत, त्यांची भविष्यात काय अवस्था होईल हे तुम्हाला कळेलच, असे सूचिक विधानही संजय राऊत यांनी केले.
आपचे खासदार संजय सिंह यांनी एक छान विधान केले आहे. संजय सिंह म्हणाले की भगवान राम वनवासात गेले होते, तेव्हा रामाचे पादुके घेऊन भरत अयोध्येत आले आणि सिंहासनावर त्या पादुकांचे संरक्षण करून राज्य केले. आता भाजपने त्या पादुकाही चोरल्या आहेत. रामाचे अस्तित्व मिटवले आहे. राम मंदिर ट्रस्टमध्ये 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. रामाची दानपेटी, सोनं, चांदी गायब झाली आहे. दानात आलेली 500 कोटी रुपयांची संपत्ती भाजपच्या नेत्यांनी चोरली आहे. सगळेच भाजपचे लोक आहेत, SIT त्यांच्यावर काय कारवाई करणार? सरसंघचालक यांना माझे आवाहन आहे की राम मंदिराच्या निर्माणात आपल्या सगळ्यांचे योगदान आहे. पण ज्या पद्धतीने राम मंदिराची लूट सुरू आहे. हे राम मंदिर लुटायला गझनी तर महमूद गझनी, अल्लाऊदीन खिलजी तर आला नाही. भाजप हे नवीन मोगल आहेत मंदिर लुटणारे. यावर मोदींनी अवाक्षरही काढलेले नाही. SIT आपला अहवाल सादर करेल आणि तो अहवालही दाबून टाकला जाईल. हे सरकार रामाच्या आशीर्वादाने आले होते आता हे सरकार रामाच्या शापाने पडेल, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.

























































