
यवतमाळमधील नेताजी मार्केट परिसरात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर फुटपाथवरील दुकानांविरोधात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. या मोहिमेविरोधात सोमवारी यवतमाळमध्ये व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला. विदर्भ अन्याय निवारण समितीच्या नेतृत्वाखाली शेकडो व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विराट मोर्चा काढत प्रशासनाच्या कारवाईचा तीव्र निषेध नोंदविला. यावेळी “गरीबांच्या पोटावर बुलडोझर का?”, “आधी पुनर्वसन, मगच कारवाई!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
क्रांती धोटे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून अतिक्रमण हटाव मोहीम तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली. या मोर्चात शहरातील शेकडो व्यापारी सहभागी झाले होते.
मोर्चादरम्यान व्यापाऱ्यांनी नगर परिषद प्रशासनावर आरोप केले. नेताजी मार्केट परिसरात ४० ते ५० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या छोट्या दुकानदारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून सुमारे २०० कुटुंबे आणि ३०० हून अधिक युवकांचे रोजगार धोक्यात आल्याचे सांगण्यात आले. कोणतेही पुनर्वसन न करता थेट अतिक्रमण हटाव कारवाई करणे अयोग्य असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
शहरातील महत्त्वाचे शासकीय भूखंड बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी मोकळे करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप व्यापऱ्यांनी करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाला थेट इशारा देत, गरीबांच्या पोटावर लाथ मारणारी ही कारवाई तात्काळ थांबवावी. पुनर्वसनाशिवाय कोणत्याही व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. प्रशासनाने निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा दिला. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरातील वातावरण तापले असून प्रशासन आणि व्यापारी यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. आता प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

























































