
लखनौमधील अलिगंजच्या पुरानिया परिसरात सोमवारी दुकान आणि कोचिंग सेटरला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला. मृतांचे वय अंदाजे 20 ते 24 वर्षांच्या दरम्यान असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी पहिल्या मजल्यावरून खाली उड्या घेतल्या. आगीमुळे अनेक जण आत अडकले होते.
आगीची माहिती मिळतात पोलीस आणि अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरू केले. अग्नीशमन दलाने अथक प्रयत्नाने एक तासानंतर आग आटोक्यात आणली. आग विझवल्यानंतर 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले. व्यावसायिक भागात असलेल्या या इमारतीत कोचिंग सेंटरव्यतिरिक्त एक पेट शॉप आणि इतर दुकानेही आहेत, असे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.


























































