
FIFA World Cup चा फिवर सुरू आहे आणि अशा परिस्थितीत आपल्या आवडत्या खेळातून आणि राष्ट्रीय संघातून वगळले जाणे कोणत्याही खेळाडूसाठी अत्यंत वेदनादायी असते. परंतु, अशा कठीण परिस्थितीतही खचून न जाता खेळावर आणि चाहत्यांवर कसे प्रेम करावे, याचा एक उत्तम आदर्श सध्या पाहायला मिळत आहे. एका दिग्गज खेळाडूला यंदाच्या FIFA World Cup 2026 स्पर्धेसाठी संघात स्थान मिळाले नाही. हा निर्णय त्याच्यासाठी प्रचंड धक्कादायक होता. स्वतः खेळाडूनेही आपण या निर्णयामुळे दुःखी असल्याचे मान्य केलं होतं. मात्र, या दुःखातून बाहेर पडत त्याने सकारात्मक दृष्टिकोन ठेवला असून, मैदानाबाहेरूनच तो आपल्या संघाला पूर्ण पाठिंबा देत आहे.
या कठीण प्रसंगातही खेळाची प्रतिष्ठा जपणारा हा खेळाडू म्हणजेच इंग्लंडचा स्टार डिफेंडर हॅरी मॅग्वायर होय. फिफा विश्वचषक 2026 साठी इंग्लंडचे व्यवस्थापक थॉमस टुशेल यांनी मॅग्वायरला 26 सदस्यीय संघात स्थान दिले नाही. एका व्हिडिओ कॉल दरम्यान मॅग्वायरला या धक्कादायक निर्णयाची माहिती देण्यात आली होती. या संघात केवळ मॅग्वायरच नाही, तर कोल पामर, फिल फोडेन आणि ट्रेंट अलेक्झांडर-आर्नोल्ड सारख्या इतर अनेक बड्या स्टार्सनाही डच्चू देण्यात आला आहे. दरम्यान, इंग्लंडच्या संघाने डॅलस येथे झालेल्या पहिल्या सामन्यात क्रोएशियाचा 4-2 असा पराभव करून विश्वचषकात धडाकेबाज सुरुवात केली असून, त्यांचा पुढचा सामना मंगळवारी घाना विरुद्ध होणार आहे.
Pues a Maguire le ha sabido mal no ir al mundial que se ha puesto a vender sobres del álbum en New York 😭 pic.twitter.com/ZckMTHz72Q
— Jeff (@JeffFcb14) June 19, 2026
संघात निवड न होऊनही 33 वर्षीय मँचेस्टर युनायटेडचा हा खेळाडू सध्या अमेरिकेत विश्वचषकाच्या रंगात रंगलेला दिसत आहे. तो न्यूयॉर्क शहरात चाहत्यांच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून रॉकफेलर सेंटर येथे चाहत्यांना ‘पॅनिनी स्टिकर अल्बम’ वाटताना दिसला. यानंतर टाइम्स स्क्वेअरजवळील युनायटेडच्या थीम-बेस्ड फॅन-बारमध्ये पोहोचून त्याने चाहत्यांशी संवाद साधला आणि प्रश्नोत्तरांच्या सत्रात भाग घेतला. आपल्या लाडक्या स्टार खेळाडूला समोर पाहून काही चाहते भावुकही झाले होते. गॅरी लिनेकर यांच्या प्रसिद्ध ‘द रेस्ट इज फुटबॉल’ या पॉडकास्टमध्येही मॅग्वायरने हजेरी लावली असून, कठीण काळातही चाहत्यांशी जोडले राहण्याच्या त्याच्या या खिलाडूवृत्तीचे जगभरात कौतुक होत आहे.


























































