
उमरखेड शहरातील ढाणकी रोडवरील पोलीस स्टेशनसमोर असलेल्या गादी तयार करण्याच्या व रेडिमेड फोम गादी विक्रीच्या दुकानाला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, हातावर पोट भरणाऱ्या व्यावसायिकाचा अनेक वर्षांचा संसार काही क्षणांत राख झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अनिल गिरी यांचे गादी तयार करण्याचे व रेडिमेड फोम गादी विक्रीचे दुकान असून सकाळच्या सुमारास दुकानातून धूर निघत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. काही कळण्याच्या आतच आगीने रौद्ररूप धारण केले. दुकानात मोठ्या प्रमाणात फोम व ज्वलनशील साहित्य असल्याने आग झपाट्याने पसरली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दुकानाचे मालक अनिल पुरी यांना शेजाऱ्यांनी दूरध्वनीवरून माहिती दिली. तोपर्यंत आगीने संपूर्ण दुकानाला विळखा घातला होता.
घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. अन्यथा आग शेजारील आस्थापनांपर्यंत पोहोचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. या आगीत दुकानातील गाद्या, फोम, साहित्य व इतर माल जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे अनिल पुरी यांनी सांगितले. अनेक वर्षांच्या कष्टातून उभा केलेला व्यवसाय काही क्षणांत भस्मसात झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
“हातावर पोट असणारा हा छोटा व्यवसाय होता. याच व्यवसायावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. आता सर्वकाही जळून खाक झाले असून संसारच उद्ध्वस्त झाला आहे,” अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, पंचनामा करून नुकसानग्रस्त व्यावसायिकाला शासनाने तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.


























































