
सध्या AI हे माध्यम जगभरात चर्चेचा विषय बनलेले असून सर्वच क्षेत्रात याचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) दिवसेंदिवस अधिक स्मार्ट होत चालले आहे. तंत्रज्ञानाचा विकास अगदी योग्य दिशेने सुरू असून जर हाच वेग कायम राहिला तर, येत्या 4 ते 5 वर्षांत AI मानवी बुद्धिमत्तेलाही मागे टाकू शकते, असा खळबळजनक दावा उद्योगपती आणि ‘टेस्ला’चे सीईओ एलॉन मस्क यांनी केला आहे. मस्क यांच्या या विधानामुळे तंत्रज्ञान जगतात पुन्हा एकदा एका नव्या चर्चेला उधाण आले आहे.
सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारे एलॉन मस्क यांनी ‘X’ वर एका बिझनेसमनच्या पोस्टला उत्तर देताना आपले मत मांडले. पीटर एच. डायमंडिस (Peter H. Diamandis) नावाच्या उद्योजकाने ‘X’ वर एक पोस्ट लिहिली होती. यामध्ये त्यांनी म्हटले की, मानवाचे भविष्य केवळ कॉम्प्युटिंग पॉवर आणि ऊर्जेवर अवलंबून नाही, तर लोकांकडे अशी साधने आणि संसाधने असणे आवश्यक आहे ज्यांच्या मदतीने ते नवीन कल्पना शोधून समस्या सोडवू शकतील, असे पोस्टमध्ये पीटर एच. डायमंडिस यांनी म्हटले.
डायमंडिस यांच्या या पोस्टवर उत्तर देताना मस्क यांनी लिहिले की, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स पुढील 4 ते 5 वर्षांत अधिक स्मार्ट होणार आहे. AI चा हा पुढील टप्पा संपूर्ण जग बदलून टाकू शकतो आणि अनेक बाबतीत तो माणसाच्या पुढे निघून जाऊ शकतो. मस्क यांच्या विधानामुळे मानवाच्या भविष्यातील अस्तित्वावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Abundance isn’t just more compute and more energy. It’s more minds. More people free to invent, create, and solve. The ceiling on human genius has always been the size of the human population, and their access to tools and resources. As humanity moves into space we shatter all…
— Peter H. Diamandis, MD (@PeterDiamandis) June 21, 2026
मानवाचे भविष्य बदलण्याची क्षमता
एलॉन मस्क यांच्या मते, भविष्यात ऑटोमेशनची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि ‘टेस्ला’च्या ‘ह्युमनॉइड रोबोट’ सारखे स्मार्ट रोबोट्स भविष्यात मानवाची जागा घेऊ शकतील. कारखान्यांमधील धोक्याची कामे, एकाच प्रकारची पुनरावृत्ती होणारी कामे आणि कष्टाची कामे हे रोबोट्स आणि AI करतील. यामुळे उत्पादनाचा खर्च तर कमी होईलच, पण वस्तूही अधिक स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
AI क्षेत्रात अब्जावधी रुपयांची गुंतवणूक
जगभरातील आघाडीच्या कंपन्या AI तंत्रज्ञानावर अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करत आहेत. यामध्ये OpenAI, Meta, Google, Anthropic आणि मस्क यांची स्वतःची xAI या कंपन्यांचा समावेश आहे. या सर्व कंपन्यांचे उद्दिष्ट पूर्वीपेक्षा अधिक वेगवान आणि शक्तिशाली AI प्रणाली तयार करणे हे आहे. आज हे AI सिस्टम्स संगणक कोड लिहिणे, कंटेंट तयार करणे आणि कठीण समस्या सोडवण्यासारखी अनेक कामे सहज करत आहेत.





























































