
‘स्त्री 2’ च्या ऐतिहासिक यशात झळकलेली अभिनेत्री श्रद्धा कपूर आता एका नव्या भूमिकेसह रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या बहुप्रतीक्षित ‘ईठा’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर आज प्रदर्शित झाला असून अवघ्या काही वेळातच या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा चित्रपट प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या संघर्षाने भरलेल्या आयुष्यातील एका अविस्मरणीय आणि ऐतिहासिक क्षणावर आधारित आहे. टीझरमधील श्रद्धाचा अभिनय आणि भूमिकेतील समर्पकता पाहून चाहत्यांमधील या चित्रपटाविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे.
चित्रपटाच्या टीझरची सुरुवात लावणीच्या सादरीकरणाने होते, पण अचानक एक संतप्त जमाव तिथे येऊन सादरीकरण थांबवतो आणि ‘ईठा’ला रंगमंचावर येण्याची मागणी करतो. दुसरीकडे, नऊ महिन्यांची गरोदर असलेली ईठा पडद्यामागे आपली तयारी करत असतानाच तिला प्रसूती कळा सुरू होतात. तीव्र वेदनेने विव्हळत असतानाही कलेप्रतीची निष्ठा आणि रंगमंचाचा आदर राखत ती सादरीकरणाचा आग्रह धरते. ‘यात तुझा जीवही जाऊ शकतो’ असा सल्ला देणारा व्हॉईसओव्हर बॅकग्राउंडला ऐकू येतो, मात्र या आव्हानाला सामोरे जात ती बाळाला जन्म देते आणि तात्काळ पुन्हा स्टेजवर सादरीकरणासाठी उभी राहते. हा अंगावर काटा आणणारा प्रसंग टीझरचे मुख्य आकर्षण ठरला आहे.
पुढील दृश्यांमध्ये इथाचा लोककलेवरील आणि प्रेक्षकांवरील असणारा प्रचंड प्रभाव पाहायला मिळतो, तर टीझरच्या शेवटी तिला ‘वादळ’ असे संबोधण्यात आले आहे. या टीझरच्या प्रदर्शनापूर्वी श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर चित्रपटाचे दोन खास पोस्टर्स शेअर करत, अवघ्या दोन तासांत टीझर येत असल्याचे सांगून चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबतच अभिनेता रणदीप हुडा आणि मोहम्मद झीशान अय्युब हे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शन आणि अभिनयाचा उत्तम मिलाफ असलेला हा भव्य चित्रपट येत्या 28 ऑगस्ट 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.





























































