
शिवसेनेशी बेइमानी करून गेलेल्या गद्दार खासदारांच्या विरोधात महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली आहे. रविवारी तीन गद्दार खासदारांना घेराव घातल्यानंतर शिवसैनिकांनी आज धाराशीव जिह्यातील नळदुर्ग येथे बेइमान ओम निंबाळकरांच्या फोटोला जोड्याने हाणले. या आंदोलनांमुळे हादरलेल्या सरकारने आता पोलिसी दडपशाही सुरू केली आहे. गद्दारांच्या रक्षणासाठी निष्ठावंत शिवसैनिकांवर कारवाई केली जात आहे. शिर्डीचे गद्दार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना मतदारसंघात येता यावे म्हणून आज शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवण्यात आले.
शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून येऊन नंतर शिंदे गटात गेलेले भाऊसाहेब वाकचौरे आज प्रथमच शिर्डीत परतणार होते. त्यांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलीस सतर्क झाले. सकाळी 10 वाजल्यापासूनच शिर्डी, कोपरगाव, संगमनेर, राहाता येथील पोलीस ठाण्यांमध्ये शिवसैनिकांना नजरकैद करण्यात आले. गद्दार खासदार ज्या रस्त्याने प्रवास करणार होते ते रस्तेही पोलिसांनी पूर्णपणे बंद करून ठेवले.
शिर्डी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आगामी दौऱयाच्या नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी शिर्डी शहरप्रमुख गगन हाडा, माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, आबासाहेब पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी जाणार होते. पोलीस त्यांच्यावर नजर ठेवूनच होते. गगन हाडा आणि बाळासाहेब जाधव यांना पोलीस बंदोबस्तातच बैठकीसाठी नेण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी या कारवाईचा जोरदार निषेध केला. ‘द्रोह करणाऱ्यांना पोलीस संरक्षण आणि निष्ठावंत शिवसैनिकांना स्थानबद्धता, ही लोकशाहीची विटंबना आहे,’ असा संताप त्यांनी व्यक्त केला.
मिरजेत फुटिरांच्या प्रतिमांना चपलांचा हार
सांगलीतील मिरज येथे गद्दार आमदार संजय शिरसाट व माजी आमदार किरण पावसकर तसेच हे पळून गेलेले सहा गद्दार खासदार यांच्या प्रतिमेला जोडे मारून शिवसैनिकांनी निषेध केला. यावेळी गद्दारांना चपलांचा हार घालून तसेच लिपस्टिक लावून आंदोलन करण्यात आले. शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या आंदोलनात शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी गद्दारांविरोधात संतप्त घोषणा देण्यात आल्या.































































