मुंबईत मान्सूनच्या सरीवर सरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी मान्सून मुंबईत दाखल झाला. मागील तीन-चार दिवस पावसाने नुसतीच हूल देत हजेरी लावली होती. त्यामुळे नागरिक प्रचंड उकाडय़ाने हैराण झाले होते. मान्सूनच्या हजेरीने हवेत गारवा निर्माण झाला असून मुंबईकर सुखावले आहेत. पावसासाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत मुंबई शहर व आसपासच्या परिसरात वादळी वायासह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

तळकोकणात जूनच्या पहिल्या आठवडय़ात दाखल झालेल्या मान्सूनचा पुढील प्रवास रेंगाळला. अरबी समुद्रातील वाऱयांच्या प्रतिकूलपरिस्थितीमुळे मान्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांना मान्सूनची दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. निम्मा जून महिना संपला तरी मुंबईचे तापमान 35 ते 36 अंशांच्या उच्चांकी पातळीवर राहिले होते. मागील दोन दिवसांत सकाळी चांगला पाऊस पडला.

हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

हवामान खात्याने मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाच्या मुसळधार हजेरीचे भाकीत केले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून अधिक सक्रिय होईल. परिणामी, मुंबईत ताशी 40 किमी वेगाने वाहणाऱया सोसाटय़ाच्या वाऱयांसह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देत हवामान खात्याने मुंबईसाठी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

अवघ्या काही तासांत निम्मा महाराष्ट्र व्यापला!

मागील दोन आठवडे थंड पडलेला मान्सून मंगळवारी चांगलाच सक्रिय झाला आणि अवघ्या काही तासांतच मान्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापला. 24 तासांत मान्सूनने अलिबागपासून मुंबई गाठतानाच पालघर जिह्यातील डहाणू ते विदर्भातील वर्धापर्यंत मजल मारली. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मान्सूनने कृपादृष्टी दाखवली. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून अधिक सक्रिय होऊन संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.