
पहिल्या हाफमध्ये पिछाडीवर पडलेल्या अल्जेरियाने दुसऱया सत्रात जबरदस्त पुनरागमन करत पदार्पण करणाऱया जॉर्डनचा 2-1 असा पराभव करत फिफा वर्ल्ड कपमधील बाद फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या. या पराभवासह जॉर्डनचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच अल्जेरियाने चेंडूवरील वर्चस्व राखले होते, मात्र जॉर्डनने शिस्तबद्ध बचाव करत प्रतिस्पर्ध्यांना रोखून धरले. उलट संधी साधत जॉर्डनने 36 व्या मिनिटाला आघाडी घेतली. अल्जेरियाच्या रामिझ झेरोकीकडून चेंडू सहज हिसकावून घेतल्यानंतर निझार अल रशदान याने उजव्या पायाच्या बाहेरील भागाने अप्रतिम फटका मारत चेंडू जाळ्यात धाडला आणि जॉर्डनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
पहिल्या हाफमध्ये अल्जेरियाला अनेक संधी मिळाल्या होत्या. अमिन गोईरीचा फटका थोडक्यात बाहेर गेला, तर फारेस चायबीचा प्रयत्न बचावपटूंनी रोखला. अनुभवी रियाद महरेझलाही गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र जॉर्डनचा गोलरक्षक याझीद अबुलैला याने उत्कृष्ट बचाव करत संघाला आघाडी कायम राखून दिली.
मध्यंतरानंतर अल्जेरियाने आक्रमणाची तीव्रता वाढवली. इब्राहिम माजा आणि नाधिर बेनबौली यांनी सतत जॉर्डनच्या बचावफळीवर दबाव निर्माण केला. अखेर 69 व्या मिनिटाला रियाद महरेझच्या अचूक कॉर्नरवर नाधिर बेनबौली याने प्रभावी हेडर करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला.
गोल झाल्यानंतर अल्जेरियाचा आत्मविश्वास अधिक वाढला. जॉर्डननेही प्रतिआक्रमण करण्याचा प्रयत्न केला. नूर अल रावाबदेहचा फटका थोडक्यात गोलपोस्टच्या बाहेर गेला, मात्र निर्णायक क्षणी अल्जेरियानेच बाजी मारली.
82 व्या मिनिटाला पुन्हा एकदा कॉर्नरवरून निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा अमिन गोईरी याने उचलला. उंच उसळलेल्या चेंडूवर त्याने अचूक फटका मारत गोल केला आणि अल्जेरियाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. उर्वरित वेळेत अल्जेरियाने आघाडी कायम राखत महत्त्वाचा विजय आपल्या नावावर केला.






























































