
ब्राझीलमध्ये हॉट एअर बलूनला आग लागून आठ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. सांता कॅटरिना राज्यातील प्रिया ग्रांडे (Praia Grande) जवळ शनिवारी ही घटना घडली. वैमानिकासह 13 जणांना वाचवण्यात यश आले आहे. वाचलेल्या पर्यटकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, बलूनमध्ये एकूण 21 प्रवासी होते. सर्वजण हॉट एअर बलूनमधून प्रिया ग्रांडे येथील निसर्गरम्य सफारीचा आनंद घेत होते. मात्र प्रवासादरम्यान हवेतच हॉल एअर बलूनला आग लागली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. आपत्कालीन पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वैमानिकासह 13 प्रवाशांची सुखरुप सुटका केली.
उड्डाणादरम्यान बलूनच्या बास्केटमध्ये आग लागली होती. वैमानिकाने आग दिसताच बलून खाली उतरवण्याचा (इमर्जन्सी डिसेंट) प्रयत्न केल्याचे समजते. बलून जमिनीच्या जवळ आल्यावर प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उडी मारण्याच्या सूचना देण्यात आल्या. अनेकांना बाहेर पडण्यात यश आले, परंतु आग तीव्र होत असताना काहीजण आतच अडकून राहिले. काही प्रवासी बाहेर पडल्यामुळे बलून हलका झाला आणि पुन्हा वर गेला; त्यानंतर खाली कोसळला असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आग कशामुळे लागली? सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले गेले होते का? याबाबत ब्राझीलच्या नॅशनल सिव्हिल एव्हिएशन एजन्सीने तपास सुरू केला आहे. दरम्यान, या उड्डाणाचे आयोजन करणाऱ्या टूर ऑपरेटरने आपल्या सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित केल्या आहेत.





























































