अभिनेते प्रकाश राज यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी; अटक होण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिणेसह बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते प्रकाश राज हे स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. मात्र आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून विविध राज्यांमध्ये एकापेक्षा जास्त मतदार ओळखपत्रे बाळगल्याच्या गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी बंगळुरू येथील एका न्यायालयाने वारंवार समन्स बजावूनही हजर न राहिल्याने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेमके प्रकरण काय?

हे प्रकरण 2019 मधील एका तक्रारीशी संबंधित आहे. वकील दिलीप कुमार यांनी बंगळुरू येथील हलासूर गेट पोलीस ठाण्यात प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, प्रकाश राज यांच्याकडे कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणासह एकूण चार राज्यांची मतदार ओळखपत्रे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, हिंदुस्थानच्या कोणत्याही नागरिकाला देशात केवळ एकाच ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी करण्याची परवानगी आहे. एकापेक्षा जास्त ओळखपत्रे असणे हा निवडणूक नियमांचा स्पष्ट भंग आहे.

दाद न मिळाल्याने कोर्टात धाव

तक्रारदार दिलीप कुमार यांच्या मते, त्यांनी 2019 मध्ये पोलिसांत तक्रार देऊनही त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर त्यांनी बंगळुरूचे पोलीस आयुक्त आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडेही दाद मागितली. मात्र, तिथूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि खासगी फौजदारी तक्रार दाखल केली.

कोर्टाच्या आदेशाचा अवमान भोवला

दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत 48 व्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेते प्रकाश राज यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी दोन वेळा समन्स बजावले होते. मात्र, दोन्ही तारखांना प्रकाश राज न्यायालयासमोर हजर झाले नाहीत. न्यायालयाच्या समन्सकडे सतत पाठ फिरवल्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने आता त्यांच्याविरुद्ध थेट अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या वॉरंटमुळे आता बंगळुरू पोलिसांकडून प्रकाश राज यांना अटक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप प्रकाश राज यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.