
इंडियन प्रीमियर लीगचा 19 वा हंगाम संपल्यानंतर मोठ्या नाट्यमय घडामोड पाहायला मिळत आहेत. यंदाच्या हंगामात सुमार कामगिरीनंतर ऋषभ पंतने लखनऊ सुपर जायंट्स संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर तो पुन्हा दिल्ली कॅपिटल्समध्ये घरवापसी करू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले असून ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांच्यात हाय-प्रोफाइल ट्रेड झाला आहे. यामुळे दोन्ही संघांचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे.
आयपीएल 2025 मेगा लिलावात लखनऊने पंतला तब्बल 27 कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून संघात घेतले होते. आयपीएल इतिहासातील ही सर्वात मोठी बोली ठरली होती. आता दिल्लीत परतताना पंतच्या मानधनात 12 कोटींची मोठी कपात झाली असून त्याला 15 कोटी रुपये मिळतील. ऋषभ पंत पुन्हा एकदा आपल्या जुन्या फ्रेंचायझीमध्ये परतला असून याआधी 8 वर्षे त्याने दिल्लीचे प्रतिनिधित्व केले आहे.
🚨 Announcement 🚨
Rishabh Pant and Kuldeep Yadav complete high-profile trade between @DelhiCapitals and @LucknowIPL.
Rishabh Pant all set to rejoin #DC at INR 15 Crore whereas Kuldeep Yadav will join #LSG at INR 13.5 Crore.
More Details ▶️ https://t.co/64HeOX143I… pic.twitter.com/tIEvj7fgNo
— IndianPremierLeague (@IPL) June 23, 2026
पंतच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्सला 2025 आणि 2026 या दोन्ही हंगामांत प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले. दोन्ही हंगामात पंतच्या बॅटमधील धावा आटल्या होत्या. 2025 च्या हंगामात पंतला 13 डावांत केवळ 269 धावा करता आल्या. तर 2026 च्या हंगामातही त्याला केवळ 312 धावा करता आल्या होत्या. पंतच्या कामगिरीचा परिणाम संघावरही झाला आणि लखनऊचा संघ तळाशी राहिला. यानंतर 29 मे रोजी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.
ऋषभ पंत याने दिल्ली कॅपिटल्स संघाकडून 111 सामने खेळले आहेत. यात त्याने 3284 धावा केल्या आहेत. दिल्लीकडून सर्वाधिक धावा करण्याचा मान त्याला मिळतो. आता तो पुन्हा दिल्लीत परतल्याने दिल्लीचा संघही उभारी घेईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. लखनऊ प्रमाणे दिल्लीसाठीही यंदाचा हंगाम खास गेला नाही. दिल्लीच्या संघालाही प्ले ऑफ गाठता आली नव्हती. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीचा संघ सहाव्या स्थानावर राहिला होता.
कुलदीपचे ना फायदा, ना तोटा
पंतच्या बदल्यात दिल्लीने लखनऊला कुलदीप दिला आहे. दिल्लीने कुलदीपला 13.5 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. याच समान किंमतीवर तो आता लखनऊ संघात सामील झाला आहे. 2016 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून पदार्पण करणाऱ्या 31 वर्षीय कुलदीप यादवचा लखनऊ हा आयपीएलमधील तिसरा संघ असेल. नुकत्याच संपलेल्या 2026 च्या हंगामात त्याला 12 सामन्यांत 10 बळी मिळवता आले होते.


























































