
प्रभाग क्रमांक ५ ‘अ’ मधील अनुसूचित जमाती राखीव जागेवर बिनविरोध निवडून आलेल्या शिंदे गटाच्या नगरसेविका सुळेखा चव्हाण यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. धुळे येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने त्यांचे कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवत ते जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांच्या अपात्रतेबाबत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी याप्रकरणी तक्रार केली. त्यानंतर समितीने सुळेखा चव्हाण यांनी सादर केलेले १९५० पूर्वीचे आदिवासी जमातीचे पुरावे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. चव्हाण यांच्या नात्यातील व्यक्तींना मिळालेली जात वैधता प्रमाणपत्रेही समितीची दिशाभूल केल्याचे तक्रारदार जाधव यांनी सांगितले. खऱ्या आदिवासी उमेदवारांवर अन्याय करून बोगस आदिवासींना राजकीय संरक्षण दिले जात आहे, असा आरोप जाधव यांनी केला.
अपात्र घोषित करून सदस्यत्व बाद करावे
प्रभाग क्रमांक ५-‘अ’ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार दीप्ती जाधव यांचा अर्ज तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी सर्वेशील शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली बाद केला होता. याची आठवण ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी करून दिली. तसेच सुळेखा चव्हाण यांना तात्काळ अपात्र घोषित करून त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणीही दिघे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.





























































