मिंध्यांचे पालनपोषणही ‘मातोश्री’च्या पाळणाघरातच झालंय, बाळासाहेबांच्या वक्तव्याची खिल्ली उडवणाऱ्यांचा संजय राऊतांनी घेतला समाचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काल मिंधे गटातील पोपट म्हणाला, हे पाळणाघर आहे का? हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवण्याचे काम मिंधे गटाने केले आणि हे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेत. बाळासाहेबांनी वृद्धाश्रमही काढले आणि पाळणाघरही काढले. याच पाळणाघरातून मिंधे तिकडे गेले. त्यांचे पालनपोषण याच मातोश्रीच्या पाळणाघरात झाले. नाही तर तुम्हाला कुणी विचारले असते, कुपोषणाने मेले असतात, असा जोरदार हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे पहिल्यांदा सरकार आले तेव्हा मातोश्री वृद्धाश्रम योजना काढली. शिवसेनाप्रमुख आणि मासाहेबांनी मातोश्री वृद्धाश्रम फार चांगल्या प्रकारे चालवला. तेव्हा पाळणाघर, वृद्धाश्रम ही मानवतेची कामं आहेत. हे मिंध्यांना कधीच जमणार नाही. तुम्ही ठेकेदारांची पाळणाघर केलेले आहे.

ते पुढे म्हणाले की, काल नांदेडमध्ये शिवसैनिकांकडून गद्दारांना आडवायचा प्रयत्न झाला. रात्रीच्या काळोखात लपून जात होते. शिवसैनिकांनी अर्धापूरला गाड्या अडवल्या. दोन-तीन गद्दार आणि त्यांच्या सुरक्षेसाठी साडे आठशे पोलीस होते. अख्खे एअरपोर्ट घेरले होते, जणू काय आम्ही इराण प्रमाणे बॉम्ब टाकणार आहोत. एवढे डरपोक आहात आणि हे काय मर्दानगीच्या गोष्टी सांगतात.

योग्य वेळी सर्वकाही बाहेर काढू

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण नव्हते, तर तुम्ही पक्षात राहायला पाहिजे होते आणि इतर बाबींसंदर्भात मातोश्रीवर येऊन चर्चा करायला हवी होती. 13 तारखेला 15 कोटींचे खोके आले. 14 तारखेला परत 5 कोटी आले. मग दिल्लीतील बैठकीचा व्हीप धुडकावला, पक्षाच्या बैठकीला गेलो नाही आणि त्यानंतर अदृश्य झाले. त्यानंतर वायबी चव्हाण येथे जाण्यापूर्वी 35 कोटी मिळाले, हे गद्दार खासदार का सांगत नाहीत. या सगळ्यांचा हिशेब माझ्याकडे असून योग्य वेळी सर्व काही बाहेर काढू, असेही राऊत म्हणाले.

शिवसैनिकांना बंदुका दाखवू नका

संजय दिना पाटील यांनी मुलीच्या उमेदवारीसाठी तमाशा केला होता. मिंधे गटात गेल्यावर ते खोटे बोलत असून मुलीसाठी त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्या जागेसाठी मनसेच्या उमेदवार माजगावकर आग्रही होत्या. पण मुलीला उमेदवारी दिली नाही तर राजीनामा देतो इथपर्यंत त्यांची मजल गेली होती. त्यामुळे आता खोटे बोलू नका, असेही राऊत म्हणाले. तसेच धमक्या देणाऱ्या खासदारांचाही राऊत यांनी समाचार घेतला. गद्दारी केलीय, 50 कोटी गिळले.. ते घेऊन गप्प बसा. शिवसैनिकांना बंदुका दाखवू नका, आमच्याकडेही बंदुका आहेत. अमित शहांचा जीवावर दादागिरी करू नका, असा थेट इशारा देत संजय राऊत यांनी देशाच्या इतिहासात अमित शहांचे नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिले जाईल असेही म्हटले.