
उत्तराखंडमधील महत्त्वाकांक्षी केदारनाथ आणि हेमकुंड साहिब रोपवे प्रकल्पांच्या कामाला गती मिळाली आहे. केदारनाथ रोपवेसाठी लिडार (LiDAR) सर्वेक्षण, व्हिडिओग्राफी आणि स्थलाकृतिक सर्वेक्षण पूर्ण झाले असून आता भू-तांत्रिक तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे यात्रेकरूंना मोठा दिलासा मिळणार असून केदारनाथचा सुमारे 13 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 30 ते 40 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरीकुंड आणि सोनप्रयाग येथील स्थानकांच्या बांधकामासाठी आवश्यक भू-तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तसेच सुरक्षित मार्ग निश्चित करण्यासाठी करण्यात आलेले स्थलाकृतिक सर्वेक्षणही पूर्ण झाले असून सोनप्रयाग–गौरीकुंड–केदारनाथ या मार्गाची प्राथमिक आखणी तयार करण्यात आली आहे. अंतिम आराखड्याला जून 2026 मध्ये मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, हेमकुंड साहिब रोपवे प्रकल्पासाठी भूसर्वेक्षणाचे काम सुरू असून खराब हवामानामुळे काही काळ थांबलेले ड्रोन सर्वेक्षण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. अंतिम टप्प्यासाठी डीजीपीएस आणि लिडार सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे. हेमकुंड साहिब रोपवे पूर्ण झाल्यानंतर सध्या अत्यंत कठीण मानली जाणारी चढाई अवघ्या 45 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे वृद्ध, दिव्यांग आणि सर्वसामान्य यात्रेकरूंना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
सोमवारी सचिवालयात उत्तराखंड रोपवे डेव्हलपमेंट लिमिटेड (URDL) च्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान नॅशनल हायवेज लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी डेहराडून ते सोनप्रयाग या मार्गावर कंटेनरसह यशस्वी सराव चाचणी पार पडल्याची माहिती दिली. यामुळे प्रकल्पाच्या वाहतूक आणि लॉजिस्टिक व्यवस्थेची तयारीही तपासण्यात आली. असे वृत्त दैनिक जागरण ने दिले आहे.
उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद बर्धन यांनी संबंधित विभागांना दोन्ही प्रकल्पांसाठी वन विभागाची मंजुरी तातडीने मिळविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच वीज, पाणीपुरवठा, सुविधांचे स्थलांतर, पार्किंग, शेवटच्या टप्प्यातील कनेक्टिव्हिटी आणि व्यावसायिक विकास यांसारखी कामे प्राधान्याने पूर्ण करण्यास सांगितले आहे. संबंधित सर्व घटकांशी सातत्याने संवाद ठेवून प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.


























































