
एकीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाचे वऱ्हांडे आणि अधिकाऱ्यांच्या केबीन सुशोभीकरणासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू असतानाच दुसरीकडे याच इमारतीतील नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी असलेली शौचालये डेंजर झोन बनली आहेत. पहिल्या मजल्यावरील शौचालयाचे छत निकामी झाले असून त्यातील पत्रे आणि प्लास्टिकच्या प्लेट्स निखळून पडल्या आहेत. उघडे स्लॅब, लोंबकणारे लोखंडी सांगाडे आणि झिरपणारे पाणी यामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. अपघातानंतरच प्रशासन जागे होणार काय, असा सवाल पालघरवासी विचारत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय ही जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची प्रशासकीय इमारत आहे. दररोज शेकडो नागरिक विविध कामांसाठी या इमारतीत ये-जा करत असतात. मात्र नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून या इमारतीत केवळ बाह्य सुशोभीकरणावर भर दिला जात असल्याचे चित्र समोर आले आहे. कार्यालयाच्या आतील भागात रंगरंगोटी, सजावट आणि इतर बदलांवर लाखो रुपयांचा खर्च केला जात असताना शौचालयाच्या दुरुस्तीकडे मात्र प्रशासनाने सप्रशोल पाठ फिरवली आहे.
- शौचालयात छतावरील फॉल सिलिंग पूर्णपणे निकामी झाले आहे.
- अनेक ठिकाणी पत्रे निखळून पडले आहेत.
- लोखंडी फ्रेम आणि प्लास्टिकच्या प्लेट्स लटकलेल्या अवस्थेत आहेत.
- छतावरून पाणी झिरपत असल्याने अवस्था अधिक धोकादायक बनली आहे.
- कोणत्याही क्षणी पत्रे किंवा लोखंडी भाग कोसळून कर्मचारी गंभीर जखमी होऊ शकतात.
“नागरिकाभिमुख कार्यालय करण्याच्या उद्देशाने इमारतीमध्ये दुरुस्ती, नूतनीकरण आणि पायाभूत सुविधा उन्नतीकरणाची कामे सुरू आहेत. दैनंदिन स्वच्छता व देखभाल निधीस मंजुरी मिळाली असून त्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. यामुळे कर्मचारी आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील.”
>- डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी, पालघर



























































