नागपाडा पोलीस मोटार विभागातील उपाहारगृहाला एफडीएचा दणका, अस्वच्छता, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 75 हजारांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आशिष बनसोडे

अस्वच्छता, अन्न बनविल्यानंतर ते नीट झापून न ठेवणे, निपृष्ट दर्जा याबाबत पोलीस कर्मचाऱयांकडून वरिष्ठांना वारंवार तक्रारी होऊनही दखल घेतली जात नव्हती. परिणामी वैतागलेल्या कर्मचाऱयांनी थेट अन्न व औषध प्रशासन विभागाकडे धाव घेतली. त्यांनी केलेल्या तक्रारीवरून एफडीएच्या पथकाने पाहणी करून नागपाडा पोलीस मोटार विभागातील उपाहारगृहाला 75 हजार रुपयांचा दंड ठोठावत दणका दिला.

मुंबई पोलिसांच्या नागपाडा मोटार परिवहन विभागातील आवारात उपाहारगृह आहे. हे उपाहारगृह सध्या शंकर महाडेश्वर हे चालवतात. या उपाहारगृहात स्वच्छता ठेवली जात नाही. बनवलेले अन्न व्यवस्थित झापून ठेवले जात नाही, अशा तक्रारी मोटार विभागातील कर्मचाऱयांनी उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱयांकडे केल्या होत्या. लेखी व तोंडी अशा दोन्ही पद्धतीने तक्रारी करूनही कोणीच याची दखल घेत नव्हते. परिणामी आम्ही एफडीएकडे याबाबत तक्रार दिली. आमच्या वरिष्ठांनी नाही, पण एफडीएने आमच्या तक्रारीची दखल घेत उपाहारगृह चालविणाऱयांना दंड ठोठावला, असे तेथील कर्मचाऱयांकडून सांगण्यात आले.

नियमानुसार कारवाई

पोलीस कर्मचाऱयांकडून नागपाडा मोटार विभागातील उपाहारगृहाबाबत तक्रार आली होती. त्यानुसार आमच्या पथकाने उपाहारगृहाची पाहणी केली. तक्रारीनुसार तेथे तथ्य आढळले. त्यामुळे संबंधिताला 75 हजारांचा दंड ठोठावला असल्याचे एका वरिष्ठ एफडीए अधिकाऱ्याने सांगितले.

तक्रारीनुसार आम्ही आधी त्याची खातरजमा करतो. त्यात तथ्य आढळले की नियमाप्रमाणे कारवाई केली जाते. त्यानुसार सदर उपाहारगृहावरदेखील तडजोडपात्र दंडात्मक कारवाई करण्यात आली. – तुकाराम मुंढे, आयुक्त (एफडीए)