सावरकरनगर येथील घटना, ठाण्यात भररस्त्यात दोन विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला; वागळे इस्टेटमध्ये गुंडांचा धुमाकूळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या वागळे इस्टेट परिसरात गावगुंडांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गुंडांच्या एका टोळक्याने एका शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला चढवत तसेच हातातील लोखंडी कड्याचे घाव घालत डोके फोडले. या घटनेत दोन्ही विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सावरकरनगर परिसरात घडली. हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये दहावीत शिकणारा ओम सिंग (१६) हा विद्यार्थी क्लासमधून घरी निघाला असताना सावरकरनगर येथील शिवमंदिराजवळ त्याला एका टोळक्याने अडवले. ओम सिंग याचा या टोळक्यातील आयुष यादव याच्याशी आधी वाद झाला होता. हा राग मनात ठेवून आयुष यादव याने ओम सिंग याच्या डाव्या डोळ्याजवळ चाकूने वार केला. त्यानंतर आदिल शेख, शाकीब शेख आणि एका अनोळखी तरुणाने त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेत ओमला लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ही घटना एनकेटी महाविद्यालयात शिक्षण घेणारा ओम याचा मित्र आदित्य विश्वकर्मा (१८) याला कळली असता तो इंदिरानगर चौकी परिसरात गेला. त्यावेळी आयुष यादव याने हातातील लोखंडी धारदार कड्याने आदित्यच्या डोक्यावर वार केले. त्यालाही आदिल शेख व शाकीब शेख याने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात आदित्यच्या डोक्याला आठ टाके पडले आहेत. त्यालाही लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.