
मुंबईकरांना गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या सरी भिजवत आहेत. मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी सकाळी पावसाने मुंबईत हजेरी लावली आहे. सकाळी मुंबई शहरातल्या अनेक भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडला, तर उपनगरांमध्ये हलक्या सरी कोसळल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सकाळपासूनच आकाश ढगाळ होतं आणि सकाळी ७ नंतर हळूहळू पावसाला सुरुवात झाली. याच वेळी प्रशासनाने पुढील तीन तासांसाठी वादळ-वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशाराही जारी केला.
सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान दक्षिण मुंबईतील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडल्याची नोंद झाली, तर पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये या काळात फक्त हलका पाऊस पडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पालिकेच्या मुख्य कार्यालयाजवळ ४५ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल कुलाबा पंपिंग स्टेशन आणि मांडवी फायर स्टेशन येथे २९ मिमी, फ्रॉसबेरी जलाशय येथे २८ मिमी, सी वॉर्ड ऑफिस (गिरगाव) येथे २४ मिमी, मेमेवाडा येथे २१ मिमी, आणि एन एम जोशी मार्ग म्युनिसिपल स्कूल तसेच डी वॉर्ड ऑफिस (ग्रँट रोड) येथे प्रत्येकी २० मिमी पाऊस पडला.
गेल्या २४ तासांत (मंगळवारी सकाळी ८ पर्यंत) मुंबई शहरात सरासरी १३.३० मिमी पावसाची नोंद झाली, तर याच काळात पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये अनुक्रमे ०.३८ मिमी आणि ०.६२ मिमी पाऊस पडला.
शहरातील सर्व मुख्य सबवे वाहतुकीसाठी खुले होते आणि वाहनांची ये-जा नेहमीसारखीच सुरू होती. उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरील लोकल सेवा व्यवस्थित धावत होत्या, तर बेस्टच्या बस सेवाही कोणत्याही अडथळ्याविना सुरू होत्या, असे महापालिकेने सांगितले. पीटीआयचे वृत्त.




























































