
तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे संस्थापक विजय यांनी आपल्या पक्षाला केवळ “अभिनेत्याचा पक्ष” म्हणून हिणवणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पक्षाची उभारणी अनेक वर्षांच्या सामाजिक आणि जनआंदोलनांमधील सहभागातून झाली असून आपण थेट चित्रपटाच्या सेटवरून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो, हा केवळ “रील” कथानक असल्याचे त्यांनी म्हटले.
विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विजय म्हणाले, “काही जण म्हणतात की मी थेट चित्रपटाच्या शूटिंग सेटवरून मुख्यमंत्री झालो. त्यांच्या भाषेत सांगायचे तर ती फक्त ‘रील’ आहे.”
ते पुढे म्हणाले, “बहुतांश लोक आधी राजकीय पक्ष स्थापन करतात आणि नंतर जनतेमध्ये जातात. आम्ही मात्र आधी जनतेमध्ये गेलो आणि त्यानंतर पक्षाची स्थापना केली. ही गोष्ट समजून न घेणारे लोक आमच्या पक्षाला फक्त अभिनेत्याचा पक्ष म्हणून संबोधतात. २०२६ च्या निवडणुकीत आम्ही कोणतीही युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवली.”
करूर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून टीव्हीकेवर करण्यात आलेल्या आरोपांनाही विजय यांनी उत्तर दिले. “करूरमध्ये ४१ जणांचा मृत्यू झाला आणि त्याचा दोष आमच्यावर टाकण्यात आला. अशा प्रकारचे राजकारण व्हायला हवे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पक्ष स्थापन करण्यापूर्वी सामाजिक आणि जनहिताच्या विविध प्रश्नांवर आपण आणि आपल्या समर्थकांनी सातत्याने काम केल्याचा दावा करत विजय यांनी अनेक आंदोलनांचा उल्लेख केला. “२०११ मध्ये आम्ही मच्छीमारांच्या समर्थनार्थ सार्वजनिक सभा घेतली आणि त्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला. जल्लीकट्टू आंदोलनाला पाठिंबा दिला. स्टरलाइटविरोधी आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन समर्थन केले. गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि प्रोत्साहनपर मदत दिली. या सर्व कामांनंतर आम्ही तमिळगा वेत्री कळघमची स्थापना केली. तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA) विरोध करणारी भूमिका घेतली,” असे त्यांनी सांगितले.
पेरियार यांच्या विचारांबाबत बोलताना विजय म्हणाले की, धार्मिक श्रद्धांचा विरोध करण्याची पेरियार यांची भूमिका टीव्हीकेने स्वीकारलेली नाही. मात्र त्यांच्या व्यापक सामाजिक तत्त्वांचा पक्षाने स्वीकार केला आहे. “आम्ही कोणत्याही विचारसरणीला विरोध करणारे नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समान संधी आणि सामाजिक न्यायाचे तत्त्व आम्ही स्वीकारले आहे. कामराज यांच्या प्रामाणिक प्रशासनाच्या मॉडेलला आम्ही मार्गदर्शक तत्त्व मानले आहे. आमचे राजकीय विरोधक आणि वैचारिक विरोधक कोण आहेत हे आम्ही स्पष्टपणे निश्चित केले आहे,” असे त्यांनी म्हटले.
आपले सरकार सर्वसामान्यांचे सरकार असल्याचा दावा करत विजय यांनी माजी मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई आणि एम. जी. रामचंद्रन यांचा उल्लेख केला. “अण्णांच्या काळात सर्वसामान्यांचे सरकार होते, एमजीआर यांच्या काळात अतिशय सर्वसामान्यांचे सरकार होते आणि विजय यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार सर्वात सामान्य लोकांचे सरकार आहे,” असे ते म्हणाले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विजय यांनी तामिळनाडूच्या जनतेचे आभार मानले आणि जनतेची सेवा करणे हीच आपल्या सरकारची सर्वोच्च जबाबदारी असल्याचे सांगितले.
























































