
होर्मुज सामुद्रधुनी आता युद्धापूर्वीच्या स्थितीत कधीही परतणार नाही. या अत्यंत महत्त्वाच्या सागरी मार्गाची देखरेख पुढे इराण आपल्याच पद्धतीने करेल, अशी ठाम घोषणा इराणच्या संसदेचे अध्यक्ष आणि प्रमुख वार्ताकार मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी केली आहे. स्वित्झर्लंडमध्ये अमेरिकेसोबत झालेल्या पहिल्या फेरीच्या तांत्रिक चर्चेनंतर ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन केले जाईल, असे स्पष्ट करतानाच त्यांनी अमेरिकेवर पुन्हा एकदा अविश्वास दाखवला आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आपल्या अणुप्रकल्पांच्या आंतरराष्ट्रीय तपासणीसाठी तयार असल्याचा दावा केला होता. हा दावाही इराणने फेटाळून लावला आहे. दुसरीकडे स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या बैठकीनंतर अमेरिकेने इराणवरील तेल निर्बंधांमध्ये 60 दिवसांची शिथिलता दिली आहे.
- पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिका-इराण चर्चा सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. दोन्ही देश 60 दिवसांत अंतिम करारावर पोहोचण्यासाठी आणि उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यासाठी सहमत झाले आहेत.
- ट्रम्प प्रशासनाने 21 ऑगस्टपर्यंत इराणला तेल आणि पेट्रोकेमिकल उत्पादने विकण्याची परवानगी दिली आहे. होर्मुज सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक सुरळीत ठेवण्यास इराणने संमती दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
- चर्चा सुरू असली तरी सैन्याची तयारी कमी झालेली नाही, असे इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे उपसचिव गदीर नेझामी यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही संकटाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सैन्य सज्ज आहे.
- होर्मुजमधून सुमारे 20 लाख बॅरल तेल घेऊन दोन टँकर्स रवाना झाले आहेत. मात्र, ही वाहतूक अजूनही युद्धापूर्वीच्या तुलनेत खूपच कमी आहे.
- स्वित्झर्लंडमधील चर्चेनंतर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची ओमानला रवाना झाले असून, तिथे होर्मुजच्या व्यवस्थापनावर पुढील चर्चा होणार आहे.
दरम्यान, स्वित्झर्लंडमधील चर्चेमुळे लेबनॉनमधील मुस्लीम आणि शिया बांधवांचा रक्तपात थांबला आहे. तसेच, इराणच्या दबावामुळे ट्रम्प यांना त्यांची एक सोशल मीडिया पोस्ट अवघ्या एका तासात बदलावी लागली आहे. तसेच इराणमध्ये सर्वोच्च नेते आयतुलला सय्यद मोजतबा खामेनी यांचाच शब्द अंतिम असेल, असेही मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी स्पष्ट केले.

























































