
ॲपलचे सध्याचे आयफोन मॉडेल्स लवकरच महाग होऊ शकतात. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) टिम कुक यांनी दरवाढ अपरिहार्य असल्याचे संकेत दिल्यानंतर, तंत्रज्ञान क्षेत्रातील विश्लेषकांनी आगामी काही आठवड्यांत आयफोन 17 मालिकेच्या किंमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर मेमरी चिप्सच्या तुटवड्यामुळे ॲपलवर उत्पादन खर्चाचा मोठा दबाव निर्माण झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डेटा सेंटर उद्योगांकडून DRAM आणि NAND फ्लॅश मेमरीची मागणी झपाट्याने वाढल्याने या घटकांच्या किमती गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
एका मुलाखतीत कुक यांनी सांगितले की, कंपनीने आतापर्यंत ग्राहकांवर अतिरिक्त भार पडू नये यासाठी प्रयत्न केले. मात्र, वाढत्या खर्चामुळे आता किंमती कायम ठेवणे कठीण होत आहे. त्यामुळे दरवाढीचा निर्णय टाळणे शक्य नसल्याचे संकेत त्यांनी दिले. तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकारांच्या मते, ही दरवाढ आयफोन 18 च्या लाँचवेळी नव्हे तर त्याआधीच लागू होऊ शकते. विशेषतः ॲपलच्या वार्षिक ‘बॅक टू स्कूल’ ऑफरच्या काळात कंपनी नवीन किंमत धोरण जाहीर करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे.
सध्या आयफोन 17e ची किंमत 599 डॉलर्सपासून सुरू आहेत. तर आयफोन 17 ची 799 डॉलर्सपासून किंमत आहे. आयफोन एअरची 999 डॉलर्स तर, आयफोन 17 प्रोची 1,099 डॉलर्स किंमत आहे. आयफोन 17 प्रो मॅक्सची 1,199 डॉलर्सपासून सुरू होते. मात्र या किमती फार काळ कायम राहतील, याची खात्री नसल्याचे विश्लेषकांचे मत आहे. संशोधन संस्थांच्या अंदाजानुसार, वाढत्या उत्पादन खर्चामुळे आगामी आयफोन 18 प्रो मॉडेलची किंमत सुमारे 1,299 डॉलर्सपर्यंत जाऊ शकते. काही अहवालांमध्ये ती 1,399 डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. विश्लेषकांच्या मते, जर ग्राहक सध्याचे आयफोन मॉडेल खरेदी करण्याचा विचार करत असतील, तर संभाव्य दरवाढीपूर्वी खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. मात्र, ॲपलकडून अद्याप कोणतीही अधिकृत किंमतवाढ जाहीर करण्यात आलेली नाही.

























































