मेहमूद गझनीने जसं सोमनाथ मंदिर लुटलं तसेच आता राम मंदिर लुटणारे मोगल सत्तेत बसले आहेत – नाना पटोले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राम मंदिरातील निधीच्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली. मेहमूद गझनीने ज्या पद्धतीने सोमनाथ मंदिराची लूट केली होती, त्याचप्रमाणे आज सत्तेत बसलेले मोगल भाजपचे नेते राम मंदिराची लूट करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

पत्रकारांशी संवाद साधताना पटोले म्हणाले की, भाजपने लाज-शरम पूर्णपणे सोडली आहे. निवडणूक आयोगाच्या कृपेने आणि बेईमानीच्या बळावर मिळवलेल्या बहुमतानंतरही भाजप इतर पक्षांतील आमदार आणि खासदार फोडण्याचे काम करत आहे. लोकशाहीची हत्या करण्याची ही पद्धत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी सुरू केली असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना पटोले म्हणाले की, अयोध्येतील भगवान श्रीराम मंदिर हे कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र आहे. मात्र, मेहमूद गझनीने ज्या प्रकारे सोमनाथ मंदिराची लूट केली होती, त्याचप्रमाणे आज सत्तेत असलेले मोगल भाजपचे नेते राम मंदिरातील निधीची लूट करत आहेत. भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या सुमारे ५०० कोटी रुपयांहून अधिक देणगीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा विषय देशासमोर गंभीर स्वरूपात आला असून सनातन धर्मीयांमध्येही याबाबत नाराजी असल्याचा दावा त्यांनी केला.

राज्यातील आर्थिक परिस्थितीवरही पटोले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विरोधी पक्षातील आमदारांना विकासनिधी मिळत नसल्याचा आरोप करताना त्यांनी ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले. सत्ताधारी पक्षातील काही लोकप्रतिनिधींनाही अशाच अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा दावाही त्यांनी केला.

राज्याच्या आर्थिक स्थितीचा उल्लेख करताना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच मांडलेल्या पुरवणी मागण्या जवळपास ७६ ते ७७ हजार कोटी रुपयांच्या आहेत. ही रक्कम राज्याच्या अर्थसंकल्पाच्या आकाराच्या तुलनेत अत्यंत मोठी असून त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. या पुरवणी मागण्या म्हणजे राज्याचा आर्थिक ताळमेळ बिघडल्याचे लक्षण असल्याचा आरोप त्यांनी केला.

जनतेकडून जीएसटी तसेच विविध करांच्या माध्यमातून गोळा होणारा पैसा नेमका कुठे खर्च केला जातो, याची माहिती राज्य सरकारने जनतेसमोर ठेवावी. यासाठी राज्य सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसकडून विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात करण्यात येणार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.