
महाराष्ट्राचा मराठमोळा खेळाडू सूर्यांश शेडगे याची लॉटरी लागली आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी टी-20 मालिकेसाठी त्याची टीम इंडियामध्ये निवड करण्यात आली आहे. दुखापतीमुळे जायबंदी झालेल्या नितीश कुमार रेड्डी याच्या जागी त्याची संघात निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने अधिकृत पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे.
🚨 News 🚨
Suryansh Shedge replaces injured Nitish Kumar Reddy in #TeamIndia‘s squads for Ireland and England series.
More Details 🔽 | #IREvIND | #ENGvIND https://t.co/M92NI1TbE0
— BCCI (@BCCI) June 23, 2026
अफगाणिस्तानविरुद्ध नुकत्याच झालेल्या एक दिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यादरम्यान नितीश कुमार रेड्डीच्या डाव्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली होती. त्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने केलेल्या तपासणीत त्याच्या मांडीला सूज आल्याचे समोर आले आहे. नितीशला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान 4 आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत त्याला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
नितीशच्या जागी संधी मिळालेला मुंबईचा सूर्यंश शेडगे सध्या उत्कृष्ट फॉर्मात आहे. श्रीलंका येथे नुकत्याच झालेल्या तिरंगी मालिकेत ‘इंडिया-ए’ कडून खेळताना मधल्या फळीत फलंदाजी करत त्याने 5 सामन्यांत 147 धावा कुटल्या. तसेच त्याने 23 षटकं गोलंदाजीही केली.
251.92 चा स्ट्राइक रेट!
सूर्यंशने 2024-25 च्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत मुंबईला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने खालच्या क्रमांकावर फलंदाजी करत तब्बल 251.92 च्या स्ट्राइक रेटने 131 धावा ठोकल्या होत्या. तसेच आयपीएल 2026 मध्येही पंजाब किंग्सकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली होती. याचेच फळ आता त्याला मिळाले आहे.




























































