
अंधेरी पूर्व येथील साकीनाका, खैराणी रोडवरील एका व्यावसायिक व निवासी संकुलाला मंगळवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींवर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणली.
खैराणी रोडवरील अब्दुल रशीद पंपाऊंडमधील तळमजला आणि तळमजला अधिक एक मजली गाळे व चाळींमध्ये मंगळवारी सायंकाळी सवासहाच्या सुमारास आग भडकली. सुरुवातीला काही दुकानांपुरती मर्यादित असलेली ही आग बघता बघता सुमारे 60 ते 70 व्यावसायिक गाळे आणि घरांमध्ये पसरली. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच स्थानिक नागरिक व पोलिसांनी जखमींना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. जाहिद अबिदुल्ला कुरेशी, तौफिक शादिलाल कुरेशी, लालचंद रामलखन गौतम आणि कमाल जलालुद्दीन शाह हे चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.

























































