वाढवण पोर्टविरोधात स्थानिकांचा उद्रेक; गुजरात-महाराष्ट्र सीमेवर प्रफुल्ल खोडा पटेलांना घेरले, संजय राऊत यांनी शेअर केला व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विनाशकारी वाढवण बंदराविरोधात भूमिपुत्रांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून हजारो मच्छीमार आणि स्थानिकांचा विरोध डावलून केंद्र सरकार हा प्रकल्प त्यांच्या माथी मारत आहे. यामुळे जनक्षोभ वाढत असून दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांना स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी याचा व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, वाढवण बंदराच्या नावाखाली गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील आदिवासी आणि कोळी बांधवार जबरदस्ती होत आहे. त्यांच्या शेत जमिनींवर अतिक्रमण होत आहे. अशातच दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल वाढवण प्रकल्पाच्या ठिकाणी गेले असता स्थानिकांनी त्यांना घेरले. ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय प्रवेश, प्रकल्पाच्या विस्ताराबाबतचे प्रश्न आणि आधीपासूनच असलेला स्थानिक विरोध या सर्वांना सामोरे जावे लागले.

ही घटना केवळ एका प्रशासकाच्या भेटीची नाही. ही आदिवासी आणि कोळी समाजाच्या जमिनी, मच्छिमारांच्या उपजीविकेवर आणि महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील पर्यावरणावर अदानींच्या फायद्यासाठी लादलेल्या प्रकल्पाविरुद्धचा थेट प्रतिकार आहे. स्थानिकांचा विरोध हा केवळ विरोधासाठी विरोध नाही, तो त्यांच्या हक्काचा आणि जगण्याचा प्रश्न आहे, असे संजय राऊत म्हणाले.

कोण आहेत प्रफुल्ल खोडा पटेल?

प्रफुल्ल खोदाभाई पटेल हे दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक आहेत. 2007 मध्ये हिम्मतनगर मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली होती. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात प्रफुल्ल खोडा पटेल हे गृहराज्यमंत्री होते. मात्र 2012 मधील निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पुढे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांची आधी दपण आणि दीव, नंतर दादरा आणि नगर हवेलीचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली.