विद्यार्थ्यांच्या खिचडीच्या तांदळाची अदलाबदल; शिक्षण समितीच्या बैठकीत शिवसेनेने दाखवले निकृष्ट तांदळाचे नमुने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

शालेय पोषण आहारात मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना देण्यात खिचडीच्या तांदळाच्या गुणवत्तेचा आणि बेकायदेशीर अदलाबदलीचा गंभीर मुद्दा आज शिक्षण समितीच्या बैठकीत उपस्थित झाला. शिवसेनेने खराब तांदळाचे नमुने बैठकीत दाखवले आणि विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱया संस्थांवर कडक कारवाईची मागणी केली.

शिवसेनेचे शिक्षण समिती सदस्य प्रियांक राऊत यांनी हरकतीचा मुद्दा मांडून प्रधानमंत्री शालेय पोषण आहार योजनेतील गंभीर अनियमिततेचा प्रश्न उपस्थित केला. तसेच, विद्यार्थ्यांना वितरित होणाऱया तांदळाच्या निकृष्ट गुणवत्तेचा मुद्दा मांडून तांदळाचा नमुना शिक्षण समिती अध्यक्षांकडे सादर केला.

प्रमोद सावंत यांनी तांदळाचा काळाबाजार करणाऱया संस्थांच्या मूळ मालकांवर आणि जबाबदार अधिकाऱयांवर कारवाई होणार का, असा संतप्त सवाल केला. पूजा महाडेश्वर यांनी कीड लागलेले तांदूळ आपण घरात खात नाही, मग विद्यार्थ्यांना खायला द्यायचे का, असा प्रश्न विचारला.

चौकशी होणार

हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात आला असून, शालेय पोषण आहारासाठी वितरित होणाऱया तांदळाच्या गुणवत्तेची चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणाची आणि संस्थांची विस्तृत माहिती पुढील बैठकीत देण्यात येणार आहे.