
डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात वारंवार निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यातच पुढील आठवड्यापासून शुक्रवार आणि शनिवारदरम्यान सलग ३६ तास पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यामुळे आज रहिवाशांचा संताप अनावर झाला. १५० हून अधिक रहिवाशांनी डोंबिवली एमआयडीसी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. पाणीपुरवठ्याच्या फसलेल्या नियोजनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
मोर्चाबाबत कार्यकारी अभियंता श्रीकांत राऊत यांना पूर्वकल्पना देण्यात आली होती. मात्र कार्यालयीन कामाचे कारण सांगून ते बाहेर गेल्याने पाणी विभागाचे उपअभियंता औदुंबर आलाट यांच्यासमोर रहिवाशांनी संताप व्यक्त केला. शुक्रवार आणि शनिवारच्या कालावधीत सलग ३६ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या नियोजनाला रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शविला. यावर येत्या दोन ते तीन दिवसांत वरिष्ठ पातळीवर बैठक होणार असून ३६ ऐवजी २४ तास पाणी बंदचा कालावधी कमी करण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. आक्रोश मोर्चात माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, बबन काळे, संजय चव्हाण, राजू नलावडे, अजय घोरपडे, अश्विनी भंडारी, आनंद पाटणे, दीपक भानुशाली, किशोर पेटकर आणि विलास बोरोले आदी सहभागी झाले होते.
अन्यथा कार्यालयातच ठिय्या
आठवड्यातून दीर्घकाळ पाणीपुरवठा बंद ठेवणे डोंबिवलीकरांवर अन्यायकारक आहे. कधी २४ तास सांगून ३६ तास तर कधी ३६ तास सांगून ४८ तास पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. हा निर्णय मागे घेतला नाही तर मोठ्या संख्येने रहिवासी पुन्हा एमआयडीसी कार्यालयावर धडक देतील आणि कार्यालयातच ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा राजू नलावडे यांनी दिला.
■ पाण्याची गळती आणि पाणीचोरी तातडीने रोखा.
■ बेकायदा नळजोडणीवर कारवाई करा.
■ निवासी भागातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करा.


























































