टाटा इलेक्ट्रॉनिक्सवर सायबर हल्ला; 630 जीबी डेटा डार्क वेबवर लीक, हॅकर्सकडून खंडणीची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी ‘टाटा इलेक्ट्रॉनिक्स’ एका मोठ्या सायबर हल्ल्याची बळी ठरली आहे. हॅकर्सनी कंपनीच्या सिस्टीममधील अत्यंत गोपनीय डेटा हॅक करून अनेक महत्त्वाच्या फाईल्स चोरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या डेटा चोरीनंतर आता हॅकर्सकडून कंपनीकडे मोठ्या खंडणीची मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या डेटा लीकमुळे कंपनीची अनेक गुपिते आणि अत्यंत महत्त्वाची माहिती जगासमोर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी जागतिक स्तरावरील आघाडीच्या ॲपल आणि टेस्ला सारख्या दिग्गज कंपन्यांना तंत्रज्ञान आणि विविध सुट्या भागांचा (पार्ट्स) पुरवठा करते.

अहवालानुसार, हॅकर्सनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या सिस्टीममध्ये ‘रॅनसमवेअर’ नावाचा घातक व्हायरस सोडला होता. हा व्हायरस सिस्टीममधील सर्व फाईल्स आणि डेटा पूर्णपणे लॉक करतो आणि त्यानंतर तो डेटा पुन्हा मिळवून देण्यासाठी हॅकर्सकडून खंडणी मागितली जाते. या सायबर हल्ल्यानंतर हॅकर्सनी डार्क वेबवर तब्बल 630 जीबीचा डेटा पोस्ट केला आहे. या लीक झालेल्या डेटामध्ये कंपनीची गुप्त माहिती, अंतर्गत ईमेल्स, कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती आणि ॲपल कंपनीशी संबंधित अत्यंत गोपनीय डिझाईनची कागदपत्रे समाविष्ट आहेत. ॲपल आणि टेस्ला या दोन्ही कंपन्या टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रमुख ग्राहकांमध्ये गणल्या जातात. त्यामुळे या लीकचा फटका त्यांनाही बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसरीकडे, टाटा इलेक्ट्रॉनिक्सने या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगितले आहे की, त्यांना या सायबर हल्ल्याची माहिती काही आठवड्यांपूर्वीच मिळाली होती. मात्र, या हल्ल्यामुळे कंपनीच्या फॅक्टरीमधील कामावर किंवा एकूण व्यवसायावर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही. हॅकर्सनी डेटा लीक केल्यानंतरच खंडणीची मागणी केली आहे. दरम्यान, या गंभीर प्रकरणाची ॲपल कंपनीकडूनही स्वतंत्रपणे चौकशी आणि तपास सुरू करण्यात आला आहे. या मोठ्या सायबर हल्ल्यानंतर आता नामांकित कंपन्यांची गुप्त माहिती आणि डेटा सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.