
रोहा नगर परिषदेने तब्बल ५५ टक्के पाणीपट्टीत वाढ करून रोहेकरांचा खिसा कापला आहे. कुंडलिका नदी संवर्धनासाठी ५० कोटी रुपयांचा निधी खर्ची घालता. मग पाण्यासाठी खिसा का कापता, असा संतप्त सवाल रोहेकरांनी केला आहे. रोहा नगर परिषदेच्या या मनमानीविरोधात नागरिकांना न्याय देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बेमुदत उपोषण सुरू केले असून आज दुसऱ्या दिवशी या आंदोलनाला रोहेकरांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.
कोकणच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, असे सांगणारे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची रोहा नगरपालिकेवर गेली ३० वर्षे सत्ता आहे. मात्र त्यानंतरही पाण्यासारख्या जीवनावश्यक वस्तूवर रोहा नगरपालिकेने भरमसाठ कर लादला आहे. एकदम ५५ टक्के इतका पाणी कर लावल्याने सर्वसामान्य रोहेकरांना मोठा झटका बसला आहे. याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख राजेश काफरे यांनी रोहा नगरपालिकेसमोर सोमवारीपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. शिवसेनेच्या या बेमुदत उपोषण आंदोलनास रोहेकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
शिवसेनेची ताकद पाठीशी
शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम यांनी उपोषणस्थळी भेट देऊन राजेश काफरे यांची विचारपूस करत आंदोलनाची माहिती घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख नंदू शिर्के, रोहा तालुका संपर्कप्रमुख रोलेश फुलोरे, रमेश विचारे, उपतालुकाप्रमुख सचिन फुलोरे, यतीन धुमाळ, ओंकार गुरव, उपशहरप्रमुख प्रीतम देशमुख, भारत वाकचौरे, मनोज लोंढेकर, विशाल साळवी, तानाजी पवार यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनीही राजेश काफरे यांची भेट घेऊन रायगड जिल्हा शिवसेना पूर्ण ताकदीने पाठीशी असल्याची ग्वाही दिली.






























































