AI आमची जागा घेणार नाही; उलट अधिक सक्षम करेल! इन्फोसिसचे नंदन नीलेकणी यांचा भागधारकांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानामुळे आयटी क्षेत्रातील कंपन्यांचे भवितव्य धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त केली जात असताना, नंदन नीलेकणी यांनी भागधारकांना आश्वस्त केले आहे. इन्फोसिसच्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “AI आमच्यासारख्या कंपन्यांची जागा घेणार नाही. उलट जे वेगाने बदल स्वीकारतील आणि उद्देशपूर्ण वाटचाल करतील, त्यांना हे तंत्रज्ञान अधिक प्रभावी बनवेल.”

इन्फोसिसचे अध्यक्ष नीलेकणी यांनी सांगितले की, कंपनी आज पूर्वीपेक्षा अधिक सक्षम आणि सुसंगत आहे. 2030 पर्यंत AI क्षेत्रात 300 ते 400 अब्ज डॉलर्सच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा असून, इन्फोसिस या संधींचा लाभ घेण्यासाठी सज्ज आहे. नीलेकणी यांच्या मते, एंटरप्राइझ AI सोल्यूशन्ससाठी केवळ अत्याधुनिक मॉडेल्स पुरेसे नसतात. त्यासाठी सखोल चाचण्या, मजबूत आर्किटेक्चर, सायबर सुरक्षा आणि डेटा गव्हर्नन्सची आवश्यकता असते. ही जबाबदारी बाह्य प्लॅटफॉर्मवर सोपवता येत नाही. त्यामुळे मोठ्या उद्योगांसाठी तंत्रज्ञान भागीदार म्हणून इन्फोसिसची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे. असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे.

“खरी संधी AI मॉडेल्स आणि एजंट्सना उद्योगांच्या पारंपरिक व्यवहार प्रणालींसोबत जोडण्यात आहे. एंटरप्राइझ प्लॅटफॉर्म आणि बुद्धिमान AI प्रणालींच्या एकत्रीकरणातूनच मूल्यनिर्मितीची पुढील लाट निर्माण होईल,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले. ग्राहकांचा विश्वास जिंकणे हीच कंपनीची सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगत नीलेकणी म्हणाले की, इन्फोसिसचे सुमारे 90 टक्के अव्वल 200 ग्राहक त्यांच्या AI प्रवासात आधीपासून कंपनीसोबत काम करत आहेत. त्यामुळे एंटरप्राइझ AI क्षेत्रात कंपनीची मजबूत पकड असल्याचा दावा त्यांनी केला. AI ही धोक्याची घंटा नसून विकासाची मोठी संधी आहे आणि योग्य वेळी योग्य बदल स्वीकारणाऱ्या कंपन्याच या नव्या तंत्रज्ञान क्रांतीत आघाडीवर राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.