
पहिल्याच पावसात मुंबईची झालेली अवस्था, मुंबईकरांना होणार त्रास, प्रवाशांचे हाल यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुंबईकरांची खरी परिस्थिती समोर मांडली. तसेच शिवसेनेच्या २५ वर्षाच्या कार्यकाळात पावसाळ्याआधी कसे काम केले जायचे याची माहिती दिली.
पत्रकारांशी बोलताना, ‘पहिल्या पावसात रस्ते, नाले जाम झाले असून अख्खी मुंबई जवळजवळ ठप्प झाल्यासारखी स्थिती आहे. भाजपचं सरकार आणि प्रशासन मुंबईत आहे, ही जबाबदारी त्यांची आहे. नालेसफाई अजिबात झालेली नाही. मुंबईतील सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत, पत्रे लावून ठेवलेले आहेत. मेट्रोची कामं अर्धवट पडलेली आहेत. याची जबाबदारी कुणी घ्यायची? कारण मुंबईचे जे पालकमंत्री आहेत ते स्वत: एक बिल्डर आहेत. अर्धी मुंबई त्यांच्या प्रोजेक्टमुळेच खणून ठेवलेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या राजधानीत राहणाऱ्या जनतेची चिंता, काळजी आहे की नाही? मेट्रोची कामे अर्धवट आहेत, पत्रे लावल्याने रस्ते छोटे झाले आहेत, रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. पावसाळ्यात नवीन कामे काढली आहेत. मुंबईकरांनी प्रवास कसा करावा? तुमच्याकडे पोलिसांचे ताफे आणि ट्रॅफिक मोकळं केलं जातं पण सामान्य माणसाची अवस्था काय आहे?’ असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले.
‘महानगरपालिका जी आमच्या काळात २५ वर्षात उत्तमरितीने सांभाळली, स्वत: पक्षप्रमुख हे पावसाळ्याच्या आधी अधिकाऱ्यांच्या नगरसेवकांच्या बैठका घेत होते. यावेळी असे काही दिसले नाही’, हे संजय राऊत यांनी अधोरेखित केले.
‘आता मिळालेल्या माहितीनुसार भारता माता परिसरासह मुंबईत सात ठिकाणी पाणी तुंबलेले आहे. त्यामुळे ट्रॅफिक झालं आहे आणि पुढले तीन-चार तास पाऊस थांबला नाही तर मुंबईचे सर्व रस्ते जाम होतील’, अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली.
विधानसभेचे अधिवेशन सुरू असून काही आमदारांनी मांडलेल्या व्यथा संजय राऊत यांनी यावेळी बोलून दाखवल्या. ते म्हणाले की, काही आमदारांचे फोन आले, मिटिंग असल्याचं त्यांनी सांगितलं, पण जे आमदार लांब राहतात त्यांना विधिमंडळात पोहोचणं कठीण आहे. अशी एकंदरीत अवस्था आहे’, अशा शब्दात सत्य परिस्थिती मांडली. तसेच फुटीर खासदारांना दिल्या जाणाऱ्या चार्टर विमान सेवेवरून टोलाही लगावला. ‘जे खासदार फुटले त्यांना गावाला जाण्यायेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी चार्टर फ्लाइट दिले. रेल्वेचा, बसचा पास असतो तसा चार्टर फ्लाइटचा पास दिला आहे. सामान्य माणूस रडेल, पण त्यांची (खासदारांची) मजा आहे’, असं संजय राऊत म्हणाले.
सत्ता आणि पैशाच्या जोरावर ‘ते’ स्वतःला मर्द समजत आहेत! संजय राऊत यांचा घणाघात
सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान देताना राऊत कडाडले, ‘आज तुमच्या पाठीशी माफियांची कवचकुंडले आहेत आणि हातात सत्ता आहे, म्हणून तुम्ही उड्या मारत आहात. पण सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर एखादा ते स्वतःला ‘मी मर्द आहे’ म्हणून ओरडून सांगत सुटतो. ज्या दिवशी तुमच्याकडची ही सत्ता जाईल, त्या दिवशी ही भाषा आम्हाला बोलून दाखवा. तुम्ही सगळे मुळात डरपोक आहात आणि म्हणूनच पळून गेलात!’, असे म्हणत त्यांनी गद्दार खासदारांना सुनावले.

































































