
भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील निकालाला आव्हान देणारी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची याचिका कोलकाता उच्च न्यायालयाने आज दाखल करून घेतली. तसेच मतदारसंघातील निवडणुकीसाठी वापरण्यात आलेले ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, सीसीटीव्ही फुटेज व मतमोजणीशी संबंधित सर्व पुरावे सुरक्षित ठेवण्यात यावे, असे आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले.
नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांचा 15,105 मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीच्या मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत ममतांनी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मतमोजणीच्या बाराव्या फेरीनंतर निवडणूक प्रतिनिधी आणि मला मारहाण करण्यात आली. भवानीपूरमधील निवडणूक निर्णय अधिकारी भाजपच्या जवळचा होता. निकालानंतर त्याला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात नियुक्त करण्यात आले, असे मुद्दे ममतांनी याचिकेत मांडले. या निकालाची वैधता तपासण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. न्या. गौरांग कांत यांच्या खंडपीठासमोर ममतांच्या याचिकेवर सुनावणी झाली. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी चार आठवडय़ांत आपले म्हणणे मांडावे, असे आदेश न्यायालयाने यावेळी दिले.
न्यायाधीश म्हणाले, माझा भाऊ भाजपचा प्रवक्ता
सुनावणीच्या सुरुवातीलाच न्यायमूर्ती गौरांग कांत यांनी फिर्यादी पक्षाचे वकील कल्याण बॅनर्जी यांना स्वतःबद्दल महत्त्वाची माहिती दिली. ‘माझे मोठे बंधू हे भाजपचे प्रवत्ते आहेत. नंतर तुम्ही कुठलाही आक्षेप घेऊ नये म्हणून मी आधीच हे स्पष्ट करत आहे, असे कांत म्हणाले. त्यावर आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, असे कल्याण बॅनर्जी म्हणाले.




























































