
पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या दरवाढीनंतर आता साखरेच्या किमतीत वाढ होणार आहे. ‘अल निनो’च्या संकटामुळे साखरेचे उत्पादन घटू शकते, असा निष्कर्ष एका अहवालातून व्यक्त करण्यात आल्याने साखरेच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हिंदुस्थान हा जगातील दुसरा सर्वात मोठा साखर निर्यातदार देश असला तरी हिंदुस्थानातील साखरेचा साठा 30 वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पेट्रोलमध्ये वापरल्या जाणाऱया इथेनॉलच्या वाढत्या मागणीमुळे उसाची मागणी वाढली आहे. अल निनो आणि कमकुवत मान्सूनमुळे ऊस उत्पादनात घट होण्याचे प्रमाण बळावले आहे. त्यामुळे जागतिक साखर उत्पादनात लाखो टनांची घट होण्याची शक्यता आहे. 2027-28 च्या हंगामात पुरवठा आणखी कमी होऊ शकतो.
निर्यात थांबवल्यास संकट गडद होईल
हिंदुस्थान जगातील सर्वात मोठय़ा साखर उत्पादक देशांपैकी एक आहे. गरजा पूर्ण करण्यासाठी हिंदुस्थानने इतर देशांना होणारी निर्यात थांबवली, तर साखरेचे संकट अधिकच गंभीर होईल, अशी भीती वर्तवली जात आहे. उसाच्या संकटानंतर हिंदुस्थानला 2016-17 आणि 2017-18 मध्ये परदेशातून साखर आयात करावी लागली होती. अल निनोमुळे 2015 मध्ये उसाची पेरणी कमी झाल्याने हिंदुस्थानने 2009 आणि 2010 मध्ये मोठय़ा प्रमाणात साखर खरेदी केली होती.




























































