अमेरिकेला जाताना हिंदुस्थानी विद्यार्थ्याला ॲमस्टरडॅममध्येच रोखले; F-1 व्हिसा वर्षभरापूर्वीच झाला होता रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या हैदराबादमधील एका हिंदुस्थानी विद्यार्थ्याला अमेरिकेला परतताना मोठा धक्का बसला. हैदराबादहून न्यूयॉर्कच्या जेएफके विमानतळाकडे जात असताना ॲमस्टरडॅम येथे ट्रान्झिटदरम्यान अमेरिकेच्या सीमा शुल्क आणि सीमा सुरक्षा (CBP) अधिकाऱ्यांनी त्याला थांबवले आणि त्याचा F-1 विद्यार्थी व्हिसा वैध नसल्याचे सांगितले.

विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, त्याला त्याचा व्हिसा जुलै 2025 मध्येच रद्द करण्यात आल्याची कोणतीही माहिती मिळाली नव्हती. विशेष म्हणजे, त्याच्यावर मद्यपान करून वाहन चालवणे वाहतूक नियमांचे गंभीर उल्लंघन किंवा इतर कोणताही कायदेशीर गुन्हा नोंदवलेला नव्हता.

अधिकाऱ्यांनी त्याला अमेरिकेत प्रवेश नाकारत स्थानिक अमेरिकन वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. परिणामी, त्याला अमेरिकेचा प्रवास रद्द करून हिंदुस्थानात परतावे लागले. असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे. विद्यार्थी जानेवारी 2025 मध्ये F-1 व्हिसावर अमेरिकेत गेला होता. अमेरिकेत प्रवेश नाकारल्यानंतरच त्याला समजले की त्याचा व्हिसा एक वर्षापूर्वीच रद्द करण्यात आला होता. यानंतर त्याने आपल्या विद्यापीठाशी संपर्क साधला. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा I-20 फॉर्म आणि SEVIS रेकॉर्ड दोन्ही सक्रिय असून तो शैक्षणिकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या ‘गुड स्टँडिंग’मध्ये आहे.

I-20 फॉर्म हा अमेरिकेतील अधिकृत शैक्षणिक संस्थेकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दिला जाणारा दस्तऐवज असून तो विद्यार्थ्याच्या प्रवेश आणि विद्यार्थी दर्जाची पुष्टी करतो. SEVIS (Student and Exchange Visitor Information System) ही अमेरिकन सरकारची ऑनलाइन प्रणाली आहे, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि स्थलांतरविषयक नोंदी ठेवण्यात येतात.

विद्यार्थी अमेरिकेत असताना त्याचा कायदेशीर दर्जा कायम आहे की नाही, हे मुख्यतः I-20 आणि SEVIS रेकॉर्डवर अवलंबून असते.तज्ज्ञांच्या मते, एखाद्या विद्यार्थ्याचा F-1 व्हिसा रद्द झाला असला तरी त्याचा I-20 आणि SEVIS रेकॉर्ड वैध राहू शकतो. कारण व्हिसा हा अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी आवश्यक असतो, तर अमेरिकेत वास्तव्यास असताना विद्यार्थ्याचा कायदेशीर दर्जा SEVIS आणि I-20 द्वारे ठरवला जातो.