
>> प्रभाकर पवार
धाराशीवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर व त्यांचा वाहन चालक समध काझी यांची ३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार डॉ. पद्मसिंह पाटील हे पवनराजे निंबाळकर यांचे चुलतभाऊ, परंतु राजकीय प्रतिस्पर्धी पवनराजे निंबाळकर यांनी २००४ साली अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यात डॉ. पद्मसिंह पाटील यांचा केवळ ४८४ मतांनी विजय झाला होता. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या या विजयाला पवनराजे यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. केवळ ४८४ मतांनी विजय, शिवाय न्यायालयात आव्हान देण्यात आल्यामुळे भविष्यात धोका नको म्हणून डॉ. पद्मसिंह पाटील यांनी सुपारी देऊन पवनराजे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप निंबाळकर कुटुंबीयांनी केला.
नवी मुंबईच्या कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नवी मुंबई गुन्हे शाखेने तपास करून प्रथम पारसमल ताराचंद बडाला जैन (वय ६७) या व्यापाऱ्याला अटक केली, परंतु पुढे तपासात दिरंगाई झाली. राजकीय दबावाखाली सूत्रधारांपर्यंत नवी मुंबई क्राईम ब्रँच काही पोहोचली नाही. तेव्हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. सीबीआयने डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह कटात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना अटक केली. त्यातील नऊ जणांविरुद्ध खटला सुरू केला आणि अलीकडे तो संपविलाही.
सीबीआय कोर्टान सर्व साक्षीदारांच्या, आरोपींच्या कबुली जबाबावर संशय व्यक्त करून गेल्या आठवड्यात धक्कादायक निकाल जाहीर केला. सुपारी देऊन ठार मारण्यात आल्याचा आरोप असलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सीबीआयने सर्वच्या सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. आरोपींविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक व सबळ पुरावेच सीबीआयने सादर केलेले नाहीत असे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी आपल्या निकालात नमूद केले आहे. डोंबिवली (पूर्व) येथे राहणारा सीबीआयचा माफीचा साक्षीदार पारसमल जैन याने पवनराजे निंबाळकर यांना ठार मारण्याची आपणच सुपारी घेतली होती हे २००९ च्या फेब्रुवारी महिन्यात त्याला अटक झाल्यानंतर दिलेल्या कबुली जबाबात सांगितले होते. त्यानंतरच सीबीआयने त्याला माफीचा साक्षीदार केले होते. त्या पारसमल जैनचा कबुली जबाब खालीलप्रमाणे जशाचा तसा – मी डोंबिवली येथे राहत असताना ठाणे येथील सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास डावखर यांचा खबरी म्हणून काम करीत होतो. यादरम्यान माझी मोहन अनंत शुक्ल या अबकारी खात्याच्या निरीक्षकाशी ओळख झाली. मी मिठाई विक्रीच्या व्यवसायात होतो. दुकान चालवीत होतो. त्या वेळी मला एडस् झाला. पैशांची मला गरज असल्याचे मी अबकारी खात्याचे अधिकारी मोहन शुक्ल यांना सांगितले तेव्हा ते म्हणाले, धाराशीवचे माजी गृह व उत्पादन शुक्ल मंत्री व विद्यमान खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांचे राजकीय प्रतिस्पर्धी पवनराजे निंबाळकर यांनी साखर कारखान्यातील घोटाळ्याची माहिती वर्तमानपत्रात छापून आणली आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांची त्यामुळे प्रचंड बदनामी झाली आहे. पवनराजे निंबाळकर यांचा खून केल्याशिवाय ही बदनामी थांबणार नाही. तुला हवी ती रक्कम देऊ, असे आश्वासन मला शुक्ल यांनी दिले. मी आर्थिकदृष्ट्या कंगाल झाल्याने होकार दिला. त्या वेळी या अबकारी खात्याच्या अधिकाऱ्याने लातूर येथे राहणारा व डिस्टिलरी प्रकल्प सांभाळणारा सतीश मंदाडे यास मला भेटावयास सांगितले.
आपल्या जबाबात पारसमल जैन पुढे म्हणतो, मोहन शुक्ल यांनी सांगितल्याप्रमाणे मी लातूरला जाऊन सतीश मंदाडे याची साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर जाऊन भेट घेतली, चर्चा केली. माझ्या मागणीप्रमाणे सतीश मंदाडे याने मला २५ लाख रुपये देण्याचे कबूल केले. पवनराजे निंबाळकर यांचे धाराशीव-लातूर येथील घर व बंगले दाखविले. त्यांचा फोटो दिला. पवनराजे निंबाळकर यांच्या दोन बायका असल्याने त्यांचे लातूर व पुणे येथील घर दाखविले. पवनराजे निंबाळकर यांचे निवासस्थान व कार्यालयाची मी तीन दिवस रेकी केली. माझ्या जवळ परवानाधारक पिस्तूल असल्याने पवनराजे यांना मीच गोळ्या घालून ठार मारायचे ठरविले होते, परंतु मला एकट्याला ते शक्य झाले नाही. २००६ च्या सप्टेंबर महिन्यात मी ‘शूटर’ शोधण्यासाठी उत्तर प्रदेशात पोहोचलो. तेथे आंबेडकर नगरातील बसखारी गावच्या कैलास यादव या बसपाच्या कार्यकर्त्याची मी भेट घेतली. त्याची व माझी मी मुंब्र्यात राहत असताना एका नगरसेवकाबरोबर ओळख झाली होती. कैलास यादवला सारे प्रकरण सांगितले. कैलास यादवने मला दिनेश तिवारी व महातम चौधरी ऊर्फ पिंटू सिंग असे दोन शूटर दिले. मी शूटरसह लातूरच्या गेस्ट हाऊसवर तीन दिवस थांबलो, परंतु पवनराजे काही तेथे आले नाहीत. माझा संयम ढळला. मी पवनराजे यांचा मोबाईल क्रमांक मिळविला. सार्वजनिक टेलिफोन बुथवरून (पीसीओ) पवनराजे यांच्याशी संपर्क साधला. मी म्हणालो, मला लातूर येथे जैन मंदिर बांधण्यासाठी जमीन विकत घ्यायची आहे. त्यासाठी आपली भेट हवी आहे. तेव्हा समोरून पवनराजे म्हणाले, मी कल्याणजवळील (शहाड) अंबड या हॉटेलात थांबलो आहे. जमीन खरेदीसाठी पवनराजे यांनी उत्सुकता दाखविल्याने मी त्यांना कळंबोली-पुणे लिंक रोडच्या चौकात बोलावले.
पारसमल पुढे म्हणतो, पवनराजे यांनी कोणतीही खातरजमा न करता स्वतःच मृत्यूला आमंत्रण दिले. तासाभराने पवनराजे यांची पांढऱ्या रंगाची स्कोडा नमूद केलेल्या ठिकाणी धडकली. गाडीजवळ येताच पवनराजे यांच्या ड्रायव्हरला मी हात दाखविला. ड्रायव्हरने गाडी थांबविली. मी ड्रायव्हरला मोहन जैन अशी ओळख सांगितली. तेव्हा पवनराजे मागच्या सीटवर झोपले होते. ड्रायव्हरने पवनराजेंना उठविले. त्यांनी गाडीची काच उघडून माझ्याकडे पाहिले. मी शूटर दिनेश तिवारी व पिंटू सिंगला इशारा केला. त्या दोघांनीही पवनराजे व त्यांचा ड्रायव्हर समध काझी यांच्या छातीचा वेध घेतला आणि काम फत्ते झाल्यावर ते निघून गेले. दोघेही मृत झाल्याची खात्री पटल्यावर मीही माझ्या इंडिका गाडीतून खोपोलीच्या दिशेने निघून गेलो.
पारसमल याने दिलेल्या कबुली जबाबानंतर तपास यंत्रणांनी साखळी जुळवून बहुसंख्य आरोपींना अटक केली, परंतु खटला जेव्हा अंतिम टप्प्यात आला तेव्हा पारसमल याने आपला कबुली जबाब बदलला. याचा फायदा बचाव पक्षाला झाला. वारंवार कबुली जबाब बदलणाऱ्या माफीच्या साक्षीदाराचा जबाब फेटाळून लावला व सर्वच्या सर्व आरोपींची न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी निर्दोष सुटका केली. ज्यांच्याविरुद्ध खटला चालू होता त्या नऊ आरोपींपैकी तीन आरोपी सत्तरी, तीन आरोपी साठी व अन्य तीन आरोपी चाळीशी पार केलेले आहेत.
इंग्लंडचे प्रसिद्ध न्यायाधीश विल्यम ब्लॅकस्टोन यांनी १८ व्या शतकात म्हटले होते, It is Better than ten guilty persons escape than one Innocent Suffer म्हणजे दहा गुन्हेगार जरी सुटले तरी चालतील, पण एकाही निर्दोषाला शिक्षा होता कामा नये. मद्रास उच्च न्यायालयानेही अलीकडे तेच म्हटले आहे. “एक हजार गुन्हेगार निर्दोष सुटले तरी चालतील, परंतु एकाही निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये.” या तत्त्वाचा न्यायाधीश नावंदर यांनी वापर केला आणि पवनराजे हत्याकांडातील आरोपींची निर्दोष सुटका केली. मग शेवटी पवनराजे यांचे खरे मारेकरी कोण? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.





























































