
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी महापालिका व अंबरनाथ, बदलापूर नगर परिषदांनी एकत्र येऊन एकच परिवहन कंपनी स्थापन केली आहे. कल्याण महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड असे या नव्या कंपनीचे नाव आहे. या कंपनीला प्रधानमंत्री ई-बस योजनेतून पहिल्या टप्प्यात शंभर एसी बसेस मिळणार असून या बसेस कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूरमध्ये धावणार आहेत. येत्या ऑगस्टपासून त्याचा शुभारंभहोणार आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा प्रवास गारेगार व आरामदायी होणार आहे.
उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी व कल्याण-डोंबिवली या शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून शहरांचा विस्तारही होत आहे. पाचही शहरांमध्ये बसने प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता या पाचही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संयुक्त सहभागातून स्वतंत्र कंपनी स्थापन केली आहे. कल्याण महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड या कंपनीचे संचालक मंडळदेखील अस्तित्वात आले असून व्यवस्थापकीय संचालक म्हणून कल्याणचे आयुक्त अभिनव गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीचे सचिव म्हणून परिवहन व्यवस्थापक डॉ. विजयकुमार द्वारे हे काम पाहणार आहेत
– संचालक मंडळाची बैठक महापौर, नगराध्यक्ष व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सोमवारी पार पडली. या बैठकीत कंपनीच्या सचिवांनी परिवहनच्या आराखड्याचे सादरीकरण केले.
– नव्याने स्थापन केलेल्या कंपनीला प्रधानमंत्री ई- बस योजनेंतर्गत एकूण ३०० एसी बसेस उपलब्ध होणार आहेत. या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने मिळणार असून पहिल्या टप्प्यात शंभर बसेस उपलब्ध होतील.
– बसेसच्या संचलनासाठी कल्याणमधील वसंत व्हॅली, वाडेघर, भिवंडीतील टेमघर साईबाबा, कोंबडपाडा आणि नागाव येथे आगार विकसित करण्यात येणार आहे. त्याशिवाय उल्हासनगरच्या रियान्सी अॅण्टेलिया, अजमेरा पॅरेडाईज समूह व स्टेशन परिसरातदेखील आगार उभारले जाईल.
विशेष प्रकल्प गट स्थापन करणार
पाचही शहरांमधील नागरिकांना सुरक्षित, आधुनिक व पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. यासाठी विशेष प्रकल्पगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेस्ट व एसटी महामंडळातील काही अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश या गटात करण्यात येईल, अशी माहिती संचालक मंडळाच्या वतीने देण्यात आली.
परिवहन विभागाचे विलीनीकरण
कल्याण महापालिकेच्या परिवहन विभागाचे नव्या कंपनीत विलीनीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या परिवहन विभागातील सर्व बसेस व कर्मचारीदेखील आता नव्या कंपनीत सामावणार असून पाचही शहरांसाठी एकच वाहतूक यंत्रणा कार्यान्वित होणार






























































