
लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून झालेला तरुणाचा मृत्यू हा अपघात नसून प्रेमसंबंधातील अडथळा दूर करण्यासाठी होणारी पत्नी आणि तिच्या प्रियकराने रचलेला पुर्वनियोजीत खुनाचा कट असल्याचे पुणे ग्रामिण पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. सेल्फी काढताना पाय घसरून पडल्याचा बनाव रचून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र, ग्रामीण पोलिसांनी याचा पर्दाफाश करीत तरूणीसह दोघांना अटक केली आहे.
सिया गोयल आणि चेतन चौधरी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, केतन विशाल अगरवाल असे मृत तरुणाचे नाव आहे. सिया आणि केतन यांचा विवाह ठरला होता. मात्र सियाला हे लग्न मान्य नव्हते. त्यातूनच केतनला संपविण्याचा कट दोघांनी रचला. योजनेनुसार 18 जून रोजी सियाने केतनला लोहगडावर नेले. चेतन आधीच किल्ल्याच्या परिसरात जाऊन थांबला होता. सिया आणि केतन पुढे गेल्यानंतर चेतन मागून आला. संधी साधून दोघांनी केतनला दरीत ढकलले.





























































