
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात झालेल्या तब्बल 200 कोटी रुपयांच्या देणगी चोरी प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) ने मंगळवारी आपला तपास अहवाल सादर केला. या अहवालात गुन्हा नोंदवण्याची आणि ट्रस्टची पुनर्रचना करण्याची शिफारस करण्यात आली असून मंदिरातील पाच वर्षाच्या देणग्यांचे ऑडिट करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच मंदिरासाठी एका वरिष्ठ अधिकाऱयाची सीईओ म्हणून नियुक्त करण्याचाही प्रस्ताव देण्यात आला आहे.
हा अहवाल गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद यांना सादर करण्यात आला आहे. देणग्यांतील अनियमितता रोखण्यासाठी काही खास सूचना देण्यात आल्या आहेत. या अहवालावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अंतिम निर्णय घेणार आहेत. राम मंदिर चोरी प्रकरणात लवकुश, अवनीश, अनुकल्प, करुणे आणि रामशंकर उर्फ टिन्नू या 5 आरोपींच्या माहितीवरून 2 कोटींची वसुली झाली आहे. याव्यतिरिक्त, चंपत राय यांच्या जवळच्या टिन्नूच्या घरातून सोने सापडले होते.
26 जानेवारी 2021 रोजी जागतिक सिंधी समाजाने अयोध्येतील ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’चे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे 200 किलो चांदी प्रत्येकी 1 किलो वजनाच्या आणि अंदाजे 1.5 कोटी रुपये मूल्य असलेल्या 200 विटांच्या स्वरूपात सुपूर्द केली होती.त्या 200 किलोच्या विटा कुठे आहेत, असा सवाल ‘विश्व सिंधी सेवा संगम’ या संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजू मनवानी यांनी केला आहे.
देणग्यांच्या मोजणीत तीन बदल
मंदिरातील व्यवस्था पूर्णपणे बदलण्यात आली आहे. मंदिरातील देणग्यांच्या मोजणीमध्ये तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. पूर्वी दानपेटीत येणाऱया देणगीच्या नोटांची मोजणी सेवादार टेबल-खुर्चीवर बसून करत होते. पण आता जमिनीवर चटई आणि गालिचा अंथरून नोटा मोजल्या जातात. आता दानपेटीतून पैसे काढताना व्हिडीओ शूटिंगही केली जाते. मंदिरात काम करणाऱया 40 विश्वासू सेवादारांना नोटा मोजण्याच्या कामात लावले आहे. जुने कर्मचारी हटवण्यात आले आहेत. बँकेच्या दोन कर्मचाऱयांना हटवून नवीन कर्मचारी नियुक्त केले जात आहेत. ट्रस्टचे महासचिव चंपत राय, सदस्य डॉ. अनिल मिश्रा आणि आमंत्रित सदस्य गोपाल राव आता मंदिराच्या दैनंदिन कामांमध्ये सक्रिय नसतील. ते मंदिराच्या व्यवस्थेशी संबंधित कोणताही नवीन निर्णय घेऊ शकत नाहीत. विश्वस्तांचे अधिकार आता गोठवण्यात आले आहेत.




























































